लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : ‘म्हाडा’ची ११ हजारांहून अधिक घरे आणि अनेक भूखंड विक्रीविना पडून आहेत. त्यांची एकत्रित किंमत सुमारे तीन हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यांची विक्री खासगी संस्थेमार्फत करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार म्हाडाचे संबंधित मंडळ निविदा प्रक्रिया राबवून बांधकाम, विपणन क्षेत्रांतील संस्थेची नियुक्ती करणार आहे.
खासगी संस्थेच्या माध्यमातून घर खरेदी करणाऱ्यांना सुरुवातीला त्याच्या एकूण किमतीच्या २५ टक्के रक्कम भरावी लागणार असून उर्वरित ७५ टक्के रक्कम मासिक हप्त्यांनी भरण्याची मुभा असेल.
पडून असलेल्या या घरांसाठी, भूखंडांसाठी वारंवार सोडत काढण्यात आली. तसेच ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेत समाविष्ट करण्यात आली. तरीही त्यांची विक्री होऊ शकली नाही.
आणखी वाचा-मुंबई : साकीनाका येथील गोदामाला आग
विरार-बोळींजची सर्वाधिक घरे
राज्यभर पडून असलेल्या घरांचा शोध म्हाडाच्या समितीने घेतला होता. आता विरार – बोळींजमधील पाच हजार घरांच्या विक्रीचे आव्हान कोकण मंडळ आणि खासगी संस्थेसमोर असेल.
घरे आणि भूखंडांच्या विक्रीसाठी पाच पर्याय सुचवण्यात आले होते. त्यांपैकी खासगी संस्थेची नियुक्ती करण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. संस्थेला प्रत्येक सदनिकेच्या, भूखंडाच्या विक्री किमतीच्या ५ टक्के रक्कम मोबदला म्हणून दिला जाणार आहे.
आणखी वाचा-मुंबई : पश्चिम द्रुतगतीमार्गावर सिमेंट मिक्सरने ६ वर्षांच्या मुलाला चिरडले
११,१८४ घरे, ७४८ भूखंड
घरांच्या विक्रीसाठी धोरण तयार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एक समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अहवालानुसार ११ हजार १८४ घरे, ७४८ भूखंड आणि २९८ अनिवासी गाळ्यांची विक्री होत नसल्याने निदर्शनास आले. ही घरे, भूखंड आणि दुकाने यांची एकूण किंमत तीन हजार ११४ कोटी रुपये आहे.