मुंबई : ऑगस्टमध्ये मुंबईत ११ हजार ६३१ घरांची विक्री झाली असून या घरविक्रीतून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसुलीतून १०६१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये घरविक्रीत काहीशी घट दिसून येत आहे. मात्र जानेवारी ते ऑगस्टदरम्यान घरविक्री स्थिर असून आता डिसेंबरपर्यंत अर्थात सणासुदीच्या काळात घरविक्रीत मोठी वाढ होण्याचा विश्वास बांधकाम व्यवसायिकांना आहे. दुसरीकडे मुद्रांक शुल्क दरात कपात होण्याची शक्यता असून यासंबंधीच्या अंतिम निर्णयाकडेही बांधकाम क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोनानंतर घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र घरांच्या किंमती अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेकजण घरखरेदीचा विचार पुढे ढकलत असल्याचे चित्र आहे. परिणामी घरांची विक्री २०२४ मध्ये स्थिर आहे. ११ ते १४ हजाराच्या आसपास आठ महिन्यांच्या कालावधीत घरविक्री झाली आहे. सर्वाधिक घरविक्री ही मार्चमध्ये झाली आहे. आर्थिक वर्षे संपु्ष्टात येत असल्याने दरवर्षी मार्चमध्ये घरविक्रीत वाढ होते, मुद्रांक शुल्क वसुली अधिक होते. त्यानुसार मार्च २०२४ मध्ये १४ हजार १४९ घरे विकली गेली होती तर यातून ११२३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, मे आणि जूनमध्ये घरविक्रीची संख्या ११ ते १२ हजाराच्या दरम्यान होती. जुलैमध्ये मात्र घरविक्रीने १२ हजारांचा टप्पा पार केला होता. ऑगस्टमध्ये घरविक्रीत पुन्हा काहीशी घट झाली असून १२ हजारांच्या आतच घरविक्रीची संख्या राहिली आहे. ऑगस्टमध्ये ११ हजार ६३१ घरांची विक्री झाली असून यातून राज्य सरकारला १०६१ कोटींचा महसूल मिळाला. ही घरविक्री समाधानकारक मानली जात आहे.

हेही वाचा – Mumbai Molestation Case : मुलींना रिक्षाने शाळेत पाठवताना सावधान, मुंबईत समोर आला धक्कादायक प्रकार!

हेही वाचा – मुंबई : मेट्रो ३ मार्गिकेतील ५७६ प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन कासवगतीने, परिणामी पुनर्वसित इमारतींच्या खर्चात भरमसाठ वाढ

मार्च वगळता जानेवारी ते ऑगस्टदरम्यान घरविक्रीत मोठी वाढ नसली तरी आता मात्र उर्वरित चार महिन्यांत घरविक्रीत मोठ्या वाढीची अपेक्षा बांधकाम व्यवसायाला आहे. कारण आता गणेशोत्स, नवरात्र, दसरा, दिवाळी असा सणासुदीचा काळ सुरु होणार आहे. भारतीय मानसिकतेनुसार सणासुदीच्या काळात घरखरेदी करण्याचा ग्राहकांचा मोठा कल असतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकासकांकडून विविध सवलतीही दिल्या जातात. त्यामुळे या काळात घरविक्री वाढते. सणासुदीच्या काळात घरविक्री वाढीची अपेक्षा बांधकाम व्यवसायाला आहेच, पण त्याचवेळी दुसरीकडे राज्य सरकारने त्यांच्या अपेक्षा पल्लवित केल्या आहेत. बुधवारी लोकसत्ताच्या नवे क्षितिज या गृहनिर्माण विषयावरील काॅफी टेबल बुकच्या प्रकाशनावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकांच्या मागणीनुसार मुद्रांक शुल्क दरात कपात करण्याचा विचार सुरु असल्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे यासंबंधीचा अंतिम निर्णय कधी होईल याकडे विकासकांचे लक्ष लागले आहे. मुद्रांक शुल्कात कपात झाल्यास घरविक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 11 thousand houses sold in august in mumbai attention to the decision to reduce the rate of stamp duty mumbai print news ssb