मुंबई : मुंबईमधील तब्बल १३ हजार ४९५ घरांची मार्च २०२४ मध्ये विक्री झाली असून मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला १०६६ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मागील वर्षी मार्च २०२३ मध्येही १३ हजार घरांची विक्री झाली होती. दरवर्षी मार्चमध्ये घरांच्या विक्रीत मोठी वाढ होते. त्यामुळेच जानेवारी आणि फेब्रुवारीपेक्षा मार्चमध्ये घरांच्या विक्रीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये १० हजार ९६७ घरांची विक्री झाली होती आणि यातून राज्य सरकारला ७६० कोटी रुपये महसूल मिळाला होता. तर फेब्रुवारीमध्ये ११ हजार ८३६ घरांची विक्री झाली होती. यातून राज्य सरकारला ८६९ कोटी रुपये महसूल मिळाला होता. मार्च २०२४ मध्ये घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील १३ हजार ४९५ घरांची मार्च २०२४ मध्ये विक्री झाली असून मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला १०६६ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.
चालू वर्षातील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांच्या तुलनेत मार्चमध्ये घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. मात्र असे असले तरी मार्च २०२२ आणि २०२१ च्या तुलनेत मार्च २०२४ मधील घरांच्या विक्रीचे प्रमाण खूपच कमी आहे. मार्च २०२१ मध्ये तब्बल १७ हजार ७२८ घरांची विक्री झाली होती. राज्य सरकारला त्यातून विक्रमी महसूल मिळाला होता. तर मार्च २०२२ मध्ये १६ हजार ७२६ घरांची विक्री झाली होती आणि यातून ११६० कोटी रुपये महसूल मिळाला होता. दरम्यान मार्च २०२० मध्ये मात्र सर्वात कमी म्हणजेच ३ हजार ७९८ घरांची विक्री झाली होती आणि यातून केवळ रु. ३०४ कोटी रुपये महसूल मिळाला होता. मार्च २०२० मध्ये करोनाकाळ सुरू झाला होता आणि याचा फटका घरांच्या विक्रीला, तसेच बांधकाम व्यवसायाला बसला होता. पण मार्च २०२१ आणि २०२२ मध्ये घरांची विक्रमी विक्री झाली. तर मार्च २०२३ आणि मार्च २०२४ मध्ये घरांची विक्री १४ हजाराचा टप्पाही पार करू शकली नाही. असे असले तरी घरांची विक्री समाधानकारक मानली जात आहे. मुद्रांक शुल्काच्या दरात कपात केल्यास घरांच्या विक्रीला आणखी चालना मिळेल, असा दावा करीत विकासकांनी मुद्रांक शुल्काचे दर कपात करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.