दहा दिवस यथेच्छ पाहुणचार केल्यानंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी बुधवार सकाळपासून सुरू झालेले विसर्जन तब्बल २४ तास चालले.
गुरुवारी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवर अखेरच्या गणरायाला निरोप दिला गेला आणि दोन दिवस ‘अॅलर्ट’ असलेल्या सुरक्षायंत्रणांनीही मोकळा श्वास घेतला. कोणतीही मोठी दुर्घटना न होता विसर्जन सोहळा पार पडला. या वर्षी तब्बल दोन लाखांवर गणेशमूर्तीचे शहरात आगमन झाले.
अनंतचतुर्दशीला ४२ हजार गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यात १९१ गौरींचाही सहभाग होता. विसर्जित करण्यात आलेल्या दोन लाख मूर्तीपैकी सुमारे २० हजार मूर्ती कृत्रिम तलावात नेण्यात आल्या. किनाऱ्यावरील २७ ठिकाणांसह शहरातील ७२ ठिकाणी विसर्जनासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली होती.
बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात झाली. दुपारी तीनपर्यंत शहरातील विविध ठिकाणी सुमारे ३८०० श्रींचे विसर्जन झाले होते. त्यातील ९० सार्वजनिक गणपती होते. दुपारनंतर किनारे तसेच तलावांजवळील गर्दी वाढू लागली.
लाडक्या गणरायाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी सर्व मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. गिरगाव, दादर, जुहू येथील चौपाटीकडील मार्गावर चालायला जागा नव्हती.
संध्याकाळी ओहोटी लागल्यावरही विसर्जनाचा ओघ कमी झाला नाही. तराफे, बोटी यांच्या माध्यमातून लहान-मोठय़ा मूर्ती भक्तांचा निरोप घेत होत्या. गुरुवार सकाळपर्यंत विसर्जनाचा सोहळा सुरू होता.
स्टिंग रे पुन्हा चावले
गिरगाव चौपाटीवर दीड दिवसाच्या विसर्जनावेळी सुमारे ७० जणांना स्टिंग रे आणि जेली फिशमुळे जखमा झाल्या होत्या. त्यानंतर पाचव्या व सातव्या दिवशी स्टिंग रे नसल्याने विसर्जन नीट पार पडले. मात्र अनंतचतुर्दशीला सकाळी पुन्हा स्टिंग रे किनाऱ्याजवळ सापडल्याने पालिकेने सावधगिरीचा इशारा दिला होता. पालिकेने कर्मचाऱ्यांना गमबूटही पुरवले होते. तरी संध्याकाळी स्टिंग रे चावल्याच्या काही घटना घटला. सात जणांना प्राथमिक उपचार केंद्रांमधून औषध देण्यात आले. पाच जणांना नायर रुग्णालयामध्ये नेण्यात आले. तेथे उपचार करून संध्याकाळीच घरी पाठवण्यात आले.
‘लालबाग’च्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे गुन्हे
सीसीटीव्ही चित्रीकरणाची मदत घेणार
‘लालबागचा राजा’च्या मंडपातील सीसीटीव्ही चित्रीकरण पाहून महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुध्द विनयभंगाचे गुन्हे दाखल केले जातील, असे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
लालबागच्या गणेशदर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होती. मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी अतिशय उर्मटपणे महिलांशीही गैरवर्तन केले, अशा अनेक तक्रारी आल्या होत्या. पण काळाचौकी पोलिसांनी त्यांची दखलही घेतली नाही, असाही आरोप करण्यात येत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की झाली. केवळ त्याबाबत गुन्हा दाखल झाला. यासंदर्भात गृहमंत्री पाटील यांना विचारता काळाचौकी पोलिसांनी विनयभंग व धक्काबुक्कीबाबत दोन गुन्हे दाखल केले आहेत. एका आरोपीला अटकही झाली असल्याची माहिती दिली. मात्र अनेक तक्रारी असताना केवळ दोन प्रकरणांचीच दखल पोलिसांनी घेतली आहे. विनयभंगाच्या प्रकरणात भाविक महिलांकडून आता तक्रार अर्ज न आल्यास काय करणार, आदी प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले. तेव्हा सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिस स्वत:हूनही कारवाई करतील, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
३६ पोलिसांवर निलंबनाची कारवाई
मुंबईतील सर्वात महत्त्वाचा आणि गर्दीच्या दृष्टीने सर्वात मोठा ‘इव्हेंट’ असलेल्या गणपती विसर्जनाच्या वेळी पोलीस बंदोबस्त चोख असतो. मात्र या बंदोबस्ताची डय़ुटी चुकवणाऱ्या ३६ पोलिसांना मुंबई पोलिसांनी निलंबित केले आहे. शिस्तभंग करणाऱ्यांना यामुळे योग्य तो संदेश मिळेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्याखालच्या पदाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
गणेशोत्सवकाळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. यंदाही पोलिसांनी असाच बंदोबस्त ठेवला होता. मात्र ३६ कर्मचारी परवानगीविना बंदोबस्त डय़ुटीवर गैरहजर राहिल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.सर्वच कर्मचाऱ्यांना बंदोबस्त डय़ुटीबद्दल सक्त ताकीद देऊनही हे ३६ जण गैरहजर राहिले. त्यांनी कोणाचीही परवानगी मागितली नाही. सर्व पोलीस दल मुंबईच्या रस्त्यांवर सुरक्षेसाठी उतरले असता, या ३६ जणांचे हे बेशिस्त वर्तन पोलीस दल खपवून घेणार नाही. तसेच बेशिस्त लोकांनाही शासन होते, हा संदेश पोलिसांमध्ये जायलाच हवा. त्यामुळे आम्ही या ३६ जणांवर निलंबनाची कारवाई केल्याचे सहपोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.