मुंबई : महाराष्ट्र आयसिस मॉडयूलशी संबंधित वीसहून अधिक जणांची राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी चौकशी केली. गेल्या आठवडय़ात टाकलेल्या विविध छाप्यांमध्ये जप्त केलेल्या साहित्याच्या आधारे एनआयएने ही चौकशी केली. त्यात आयसिसमध्ये सामील होण्यासाठी इराकमध्ये गेलेल्या आरिब माजिदचाही समावेश आहे.
हेही वाचा >>> मुंबई : पोलिसांनी तीस तासात चोरांच्या मुसक्या आवळल्या; ४.०३ कोटी रुपये हस्तगत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यादरम्यान एनआयएला हमास या दहशतवादी संघटनेचे झेंडे सापडले. ६ डिसेंबर रोजी इस्रायलच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीत अनेक लोक सहभागी झाले होते. या प्रकरणातील संशयित आरोपींसोबत या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना एनआयएने समन्स बजावले होते. त्यात मीरारोड, पडघा, बंगळूरु येथील व्यक्तींचा समावेश आहे. एनआयएने आयसिसशी संबंधित भिवंडी येथील पडघा येथे शनिवारी छापा टाकला. या कारवाईत संशयास्पद वस्तूंसह १५ संशयितांना अटक करण्यात आली होती. गेल्या महिन्यात ‘एनआयए’ने ‘आयसिस’ आणि ‘अल सुफा’ या दहशतवादी संघटनांशी संबंधित फरारी मोहम्मद शाहनवाज आलम (रा. झारखंड) याला दिल्लीत अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘एनआयए आणि ‘एटीएस’च्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील पडघा, मीरा रोड तसेच पुण्यासह राज्याच्या वेगवेगळया भागांत छापे टाकून दहा संशयितांना ताब्यात घेतले, तर उर्वरित पाच जणांना बंगळूरुतून अटक करण्यात आली. छाप्यांमध्ये मोठया प्रमाणात बेहिशेबी रोकड, शस्त्रास्त्रे, संशयास्पद कागदपत्रे, मोबाइल संच जप्त करण्यात आले.