मुंबई : विमानतळावर भरतीसाठी मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी गर्दी केल्यामुळे मंगळवारी तेथे चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. ६०० रिक्त पदांसाठी तब्बल २५ हजारांहून अधिक इच्छुकांनी अर्ज केले होते. इच्छुकांच्या गर्दीचे नियोजन करताना विमानतळावरील कर्मचाऱ्यांची प्रचंड दमछाक झाली.
अर्जदार अर्जभरण्यासाठी केंद्रावर पोहोचण्यासाठी धक्काबुक्की करीत होते. अनेक इच्छुकांना खाण्या-पिण्याशिवाय तासंतास रांगेत थांबावे लागले. चेंगराचेंगरीत अडकलेल्या अनेकांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे काही उमेदवार अर्ध्यावरूनच मागे फिरले. ६०० पदांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्जदार दाखल होतील, याचा अंदाज आला नाही. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. सुमारे २५ हजार अर्जदार तेथे आले होते. अनेक उच्चशिक्षित उमेदवारही नोकरीसाठी तेथे आले होते. दरम्यान, कोणीही रुग्णालयात भरती झाल्याची माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा : छत्रपती संभाजी नगरमधील नक्षत्रवाडीत लवकरच म्हाडाची १०५६ घरे, अतुल सावे यांची घोषणा
सध्या एअर इंडियाकडून विमानतळावर लोडर्ससाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विमानात सामान लोड करणे आणि उतरवणे, बॅगांची ने-आण करणे आणि बॅगांची गाजी चालवणे काम लोडर्सना दिले जाते. प्रत्येक विमानाला प्रवाशांचे सामान, माल वाहतूक आणि अन्न पुरवठा हाताळण्यासाठी किमान पाच लोडर्सची आवश्यकता असते.