मुंबई : कर्करोगग्रस्त महिलांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारच्या कामा रुग्णालयामध्ये सुरू केलेल्या केमोथेरपी उपचार केंद्रामुळे रुग्ण महिलांना दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे गर्भाशय कर्करोगाने ग्रस्त असलेल्या ३०० पेक्षा जास्त महिलांवर येथे चार वर्षांत मोफत उपचार करण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे दरवर्षी ३ लाखांपेक्षा जास्त महिलांचा मृत्यू होतो. या कर्करोगाचे उच्चाटन करण्यासाठी १७ नोव्हेंबर हा दिवस जागतिक गर्भाशय मुख कर्करोग निर्मूलन दिन म्हणून पाळला जातो.
हेही वाचा >>> पुढील वर्षांत शनिवार, रविवारला जोडून नऊ सुट्टय़ा; कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर
या कर्करोगाची सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे हा कर्करोग झाल्याचे तात्काळ लक्षात येत नाही. परिणामी, अनेक महिलांसाठी हा धोकादायक ठरतो. त्यातच टाटा रुग्णालयामध्ये रुग्णांची मोठी प्रतीक्षा यादी असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने महिलांसाठी विशेष असलेल्या कामा रुग्णालयामध्ये स्तन व गर्भाशयच्या कर्करोगाने ग्रस्त महिलांसाठी केमोथेरपी व रेडिओथेरपी केंद्र सुरू केले. केंद्रामध्ये गर्भाशय मुख कर्करोगने ग्रस्त ३०२ महिलांवर यशस्वी उपचार करण्यात आले. त्याचप्रमाणे स्तन कर्करोगग्रस्त ७३६ महिलांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली. गेले दीड वर्ष कामा रुग्णालयातील रेडिओथेरपी यंत्र बंद असल्याने रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास उपचार करणे सोपे होते. मात्र, जेव्हा लक्षणे दिसतात तेव्हा कर्करोग पुढील टप्प्यात गेलेला असतो. त्यामुळेच महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.
– डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय