मुंबई : केंद्र सरकारच्या ‘वेव्हज २०२५’ या कार्यक्रमाची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेतील ४०० हून अधिक अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. या कामाला जुम्पल्यामुळे अभियंत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच पालिकेच्या पावसाळा पूर्व कामांवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने १ ते ४ मेदरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ (वेव्हज २०२५) या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी ४०० हून अधिक अभियंते आणि प्रमुख विभागांमधील तांत्रिक कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. या कामाच्या निमित्ताने २६ एप्रिल ते ४ मे या कालावधीसाठी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे अभियंत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांनी अभियंते आणि त्यांच्या संघटनेला पाठिंबा दिला आहे. पालिका प्रशासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी शेख यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या ‘वेव्हज २०२५’साठी पालिकेने जवळपास ५०० कर्मचारी तैनात केले आहेत. यापैकी सुमारे ४०० अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी आहेत. हे अभियंते रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, पूल यासह इतर विभागातील आहेत. रस्त्यांची कामे, नालेसफाई आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी पावसाळापूर्व तयारीच्या कामांमुळे सध्या कर्मचाऱ्यांची आधीच कमतरता आहे. तसेच अभियंत्यावर कामाचा अतिरिक्त भार आहे. महापालिकेचे मुख्य काम हे नागरी सेवा सुरळीत पुरवणे असून त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सद्यस्थितीत हे अभियंते तैनात करण्याच आल्यामुळे महत्त्वाच्या कामांवर परिणाम होईल. आणि पावसाळ्यात नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागेल,असा आरोप शेख यांनी केला आहे.कार्यक्रम आयोजकांना अशा कामांसाठी आवश्यक तज्ञ असलेले तात्पुरते कर्मचारी सहजपणे नियुक्त करता आले असते, अशी सूचना शेख यांनी केली आहे.

म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशननेही पालिकेच्या या निर्णयाला विरोध केला आहे. या कामासाठी अभियंत्याची नियुक्ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी संघटनेने मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून केली आहे.