मुंबई : रेल्वे मार्गालगत सुरक्षा भिंत, सुरक्षा जाळी नसल्याने मोकाट जनावरे चाऱ्याच्या शोधात रेल्वे रुळावर येतात. रेल्वेगाडीची धडक लागून गायी, म्हैशीचा मृत्यू होतो. तसेच अनेक वेळा आपत्कालीन ब्रेक दाबून रेल्वेगाडी थांबवण्यात येते. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होते. जनावरे रेल्वे रुळांवर येत असल्याने मोठा रेल्वे अपघात होऊन प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे. एप्रिल – नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ४०० हून अधिक वेळा मोकाट जनावरे रेल्वे रुळावर येऊन लोकल, रेल्वेगाड्यांसाठी धोकादायक ठरल्याच्या घटना घडल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या मुंबईसह पुणे, भुसावळ, सोलापूर, नागपूर या पाच विभागांत मोकाट जनावरांचा रेल्वे रुळावरील वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे अनेक वेळा कर्तव्यावरील कर्मचारी त्यांना तेथून हटवतात. मात्र, चाऱ्याच्या शोधात ही जनावरे वारंवार रेल्वे रुळावर येतात. एप्रिल २०२२ मध्ये टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान तीन म्हशी लोकल खाली आल्या होत्या. यात दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याने प्रवासी बचावले. तसेच कासू – नागोठणे, आपटा – जिते आणि रोहा – नागोठणे या भागात मोठ्या प्रमाणात अशा घटना घडतात. त्यामुळे मध्य रेल्वे यावर उपाययोजना करीत आहे.
हेही वाचा – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
एप्रिल – नोव्हेंबर २०२२ या कालावधीत रेल्वे रुळांवर वावरणाऱ्या जनावरांची ४६८ प्रकरणे निदर्शनास आली. याच कालावधीत यंदा ४१३ प्रकरणे घडली असून, हे प्रमाण कमी झाले आहे. या प्रकरणांपैकी मुंबई विभागात ७० प्रकरणे, भुसावळ विभागात ९४ प्रकरणे, नागपूर विभागात २११ प्रकरणे, पुणे विभागात १८ प्रकरणे, सोलापूर विभागात २० प्रकरणे घडल्याचे निदर्शनास आले. रेल्वे रुळाजवळ जनावरे येऊ नयेत यासाठी रेल्वे रुळावर खाद्यपदार्थ वा कचरा टाकू दिला जात नाही. जनावरांचा अपघात होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी वारंवार शिट्टी वाजवण्यासाठी रेल्वे कर्मचारी तैनात करण्यात येतात. तसेच सुरक्षा भिंत, कुंपण बांधण्याची कामे करण्यात येत आहेत. ग्रामस्थांमध्ये समुपदेशन केले जाते, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.