मुंबई : पॅनकार्ड क्लब लि. गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नुकतीच मुंबई व दिल्लीतील चार ठिकाणी छापे टाकले. याप्रकरणात ५० लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची साडेचार हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संशयीत आरोपींच्या परदेशी मालमत्तांबाबची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

ईडीने सेबी कायदा १९९२ अंतर्गत मे. पॅनकार्ड क्लब लि. आणि इतरांविरोधात ही कारवाई केली. या शोध मोहिमेदरम्यान, मुख्य आरोपी दिवंगत सुधीर मोरावळकर (तत्कालीन पॅनकार्ड क्लबचे संचालक) यांच्या कुटुंबीयांकडून परदेशातील मालमत्तेविषयक विविध आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली. तसेच, या मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्यात आल्या असून त्याद्वारे उत्पन्न मिळत असल्याचे निदर्शनास आले आले. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा मे. पॅनकार्ड क्लब लि. आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता, १८६० आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसुरक्षा (वित्तीय आस्थापना) अधिनियम, १९९९ (एमपीआयडी) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे.

मे. पॅनकार्ड क्लब लि. व त्यांच्या संचालकांनी ३ ते ९ वर्षांच्या कालावधीसाठी विविध गुंतवणूक योजना आणल्या होत्या. यामध्ये हॉटेल सवलत, अपघाती विमा आणि ठेवीवर उच्च परताव्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या योजनाद्वारे सेबी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. शोध मोहिमेदरम्यान सहआरोपी व कुटुंबीयांकडून गुन्ह्यातून मिळालेल्या संपत्तीची विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पुरावेही सापडले. याशिवाय, विविध डिजिटल नोंदीही जप्त करण्यात आल्या. याप्रकरणाचा पुढील तपास ईडी करीत आहे.

फसवी योजना राबवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या पॅनकार्ड क्लब गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हा शाखाही करीत आहे. या प्रकरणी ५० लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची ४५०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती ईडीने दिली. हे प्रकरण सात हजार कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गुंतवणूकदारांना सभासदत्त्व देऊन त्यांना गुंतवणूक करण्यासाठी उद्युक्त करण्यात आले. त्यासाठी त्यांना विविध हॉटेलमध्ये हॉलिडे पॅकेज देण्यात येत होते. त्या आमिषाला बळी पडून देशातील ५० लाखांहून अधिक गुंतवणूकदारांनी या योजनेत गुंतवणूक केली होती.

Story img Loader