लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : केंद्र सरकारने २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. मात्र मुंबईत २०२३ मध्ये तब्बल ६३ हजारांहून अधिक नवीन क्षयरुग्ण आढळले असून, दोन हजारांहून अधिक क्षयरुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने क्षयमुक्तीबाबत केलेली घोषणा मुंबईत धूसर बनू लागली आहे.

गतवर्षी मुंबईमध्ये तब्बल ६३ हजार ६४४ नव्या क्षयरोग रुग्णांची केंद्र सरकारच्या निक्षय प्रणालीवर नोंद झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. यावरून मुंबईत प्रत्येक तासाला साधारणपणे क्षयरोगाचे सात रुग्ण सापडत आहेत. तसेच २ हजार १४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. क्षयरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असताना गतवर्षी फक्त १० हजार ९१३ रुग्णांनी क्षयरोगावर मात केली आहे.

आणखी वाचा-नव्या वर्षात मुंबईतील १० हजार ४६७ घरांची विक्री

क्षयरोग रुग्णावर उपचार सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर फुफ्फुसाव्यतिरिक्त अन्य प्रकारच्या क्षयरोगासाठी नऊ महिने आणि औषध प्रतिरोधी क्षयरोग रुग्णांसाठी दोन वर्षांनंतर त्यांच्या आजाराचे आकलन करण्यात येत असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे रुग्ण बरे होण्यात मदत होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. एचआयव्ही झालेल्या रुग्णांमधील रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत असल्याने त्यांना क्षयरोग होण्याचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे कुपोषिक बालकांना क्षयरोग होण्याचा धोका तीन पट अधिक असतो.

क्षयरोग रुग्णांचा मृत्यू अन्य कोणत्याही कारणाने होऊ शकतो. मात्र असे असले तरी त्या रुग्णाचा क्षयरोगाने मृत्यू झाल्याची नोंद होते. त्यामुळे क्षयरोग रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक दिसून येते. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के इतके आहे. निक्षयवर नोंदणी झाल्यानंतर ती अद्ययावत होण्यासाठी वेळ लागत असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 63 thousand tuberculosis patients have been recorded in mumbai in the past years mumbai print news mrj
Show comments