सिंधुदुर्ग ४५ वर्षांवरील तर मुंबई १८ वर्षांवरील लसीकरणात अग्रेसर

मुंबई : सप्टेंबरमध्ये राज्यातील लसीकरणाने चांगलाच वेग घेतला असून गेल्या आठ दिवसांमध्ये ६५ लाख १५ हजार जणांचे लसीकरण झाले आहे. राज्यात ४५ वर्षांवरील सर्वाधिक लसीकरण सिंधुदुर्गमध्ये झाले आहे, तर १८ वर्षांवरील लसीकरणात मुंबई प्रथम क्रमांकावर आहे.

राज्यात जुलैपासून लसीकरण वेगाने सुरू झाले आहे. जुलैमध्ये १ कोटी २१ लाख मात्रा देण्यात आल्या. आत्तापर्यंत सर्वाधिक १ कोटी ४४ लाख मात्रा ऑगस्टमध्ये प्राप्त झाल्यामुळे या महिन्यात सर्वाधिक लसीकरण झाले. १ ते ८ सप्टेंबर या काळातही मोठ्या प्रमाणात लशींचा साठा राज्याला मिळाल्यामुळे ६५ लाख १५ हजार ९७६ मात्रा दिल्या गेल्या.

सिंधुदुर्गमध्ये ४५ वर्षांवरील ९० टक्के नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. या खालोखाल कोल्हापूर (८५ टक्के), भंडारा (८३ टक्के), सातारा (७९ टक्के), सांगली (७७ टक्के) यांचा समावेश आहे. मुंबईत १८ ते ४४ वयोगटातील ७१ टक्के नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतलेली आहे. या पाठोपाठ पुण्यात ६७ टक्के, भंडाऱ्यामध्ये ५६ टक्के प्रमाण आहे.

मुंबईत आणि राज्यात विक्रम

बुधवारी १५ लाख ३ हजार ९५९ जणांचे लसीकरण करत राज्याने लसीकरणाचा नवा विक्रम नोंदवला आहे. आतापर्यंतचे हे एका दिवसातील सर्वाधिक लसीकरण आहे, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. मुंबईतही बुधवारी सर्वाधिक १ लाख ८४ हजार लसीकरण झाले असून मुंबईनेही लसीकरणाचा नवा विक्रम केला आहे.  बुधवारी १ लाख २४ हजार लसीकरण पालिकेच्या केंद्रावर झाले आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.