केंद्रीय मंत्री आणि दक्षिण मुंबईतील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा, उत्तर मुंबईतील काँग्रेस उमेदवार संजय निरूपम, पुण्यातील काँग्रेस उमेदवार विश्वजीत कदम व भाजपचे अनिल शिरोळे यांना राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांनी ‘पेड न्यूज’ प्रकरणी दोषी मानले आहे. राज्यभरात सुमारे ७० हून अधिक प्रकरणात ‘पेड न्यूज’ चा निष्कर्ष काढण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांनीही तो मान्य केला असून त्यापोटीचा खर्च निवडणूक खर्चात समाविष्ट केला आहे.  
‘पेड न्यूज’ वर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोगाने जिल्हा स्तरावर समित्या नेमल्या होत्या. त्यांच्या शिफारशीनंतर या नोटीसा बजावण्यात आल्या. राज्यभरात सुमारे ३५० हून अधिक प्रकरणात संबंधित उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीसा बजावल्या. त्याविरोधात देवरा, निरूपम, कदम व शिरोळे यांनी राज्य समितीकडे अपील केले. मात्र नुकत्याच झालेल्या सुनावणीच्या वेळी देवरा व निरूपम यांनी राज्य समितीपुढील अपीले मागे घेतली. त्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन खर्चात हा खर्च दाखविण्याशिवाय पर्याय नसल्याचे सूत्रांनी सांगितले. कदम व शिरोळे यांची अपीले राज्य समितीने फेटाळल्याने त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा पर्याय होता. अन्यथा त्यांनाही आपल्या दैनंदिन खर्चात हा खर्च दाखवावा लागेल.

Story img Loader