मुंबई : सध्याच्या सामाजिक राजकीय स्थितीत समतेचे व एकोप्याचे विचार समाजामध्ये रुजणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक संस्थेतर्फे साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त साने गुरुजी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात ८० हून अधिक समविचारी संस्था व संघटना सहभागी होणार आहेत. येत्या २१ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ‘प्रारंभ मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.

साने गुरुजींनी महाराष्ट्राला समता, बंधुता, परस्पर प्रेम आणि सद््भावनेचा विचार दिला. पुढील काळात याच सामुहिक प्रेरणेतून हा विचार भारतीय समाजमनात खोलवर रुजत गेला. मात्र अलिकडल्या काळात देशात ज्या रितीने परस्पर द्वेषाचे राजकारण करण्यात येत आहे, जाती-धर्माच्या नावाने समाजात दरी निर्माण केली जात आहे, त्यामुळे समाजातील एकोपा संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, पुढील वर्षभर साने गुरुजींच्या विचार प्रेरणेने कार्यरत असणाऱ्या संस्था, संघटनांकडून ‘साने गुरुजी १२५ अभियान’ राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील विविध भागात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून समाजात बंधुता व समतेच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्र सेवा दल, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, साने गुरूजी कथामाला, विविध शेतकरी, कामगार संघटना आदी विविध संस्थांचा समावेश असणार आहे. या अभियानाची घोषणा १० जून रोजी पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठात करण्यात आली होती. समाजातील स्पृश्य – अस्पृश्यातील विचारला छेद देऊन साने गुरुजींनी उपोषण करून पंढरपूर मंदिर प्रवेश लढा दिला होता.

हेही वाचा >>>गोरेगाव मुलुंड प्रकल्पाचा खर्च ४७ कोटींनी वाढणार, उपयोगिता सेवा वाहिन्या हलवण्याच्या कामामुळे खर्च वाढला

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रारंभ मेळाव्या’त प्रसिद्ध लेखक, कबिराचे मर्मज्ञ अभ्यासक पुरुषोत्तम अगरवाल, दलित चळवळीचे अभ्यासक भंवर मेघवंशी, समिक्षक, संशोधक प्रा. रमेश वरखेडे, साने गुरूजींच्या साहित्याच्या अभ्यासक डॉ. चैत्रा रेडकर, जैष्ठ सामजिक कार्यकर्ते आणि अभियान प्रतिनिधि डॉ. संजय मं. गो. उपस्थित राहणार आहेत.