लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळ्यापूर्व सर्वेक्षणाचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून आठवड्याभरात उर्वरित काम पूर्ण करून म्हाडाचे इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ १५ मेपर्यंत अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करणार आहे.
मुंबईतील १४ हजारांहून अधिक उपकरप्राप्त इमारतींच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी म्हाडाच्या दुरुस्ती मंडळावर आहे. या सर्व इमारती धोकादायक असल्याने त्यांची दुरुस्ती मंडळामार्फत नियमितपणे केली जाते. तर दुरुस्तीच्यापलिकडे गेलेल्या इमारती अतिधोकादायक घोषित करून त्या रिकाम्या करण्यात येतात. या इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले जाते. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ही प्रक्रिया केली जाते. यासाठी सर्वात आधी मंडळाकडून इमारतींचे सर्वेक्षण केले जाते आणि यातून अतिधोकादायक इमारती शोधल्या जातात. त्यानुसार यंदाचे सर्वेक्षणाचे काम वेगात सुरू असल्याची माहिती दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. मागील काही महिन्यांपासून मंडळाच्या सर्व विभागांकडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत सर्वेक्षणाचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वेक्षणाचे उर्वरित काम आठवड्याभरात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. काम पूर्ण झाल्यानंतर १५ मेपर्यंत अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाईल, असेही डोंगरे यांनी सांगितले. मंडळाकडून अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर झाल्यानंतर संबंधित इमारतीतील रहिवाशांना नोटिसा बजावल्या जातील. त्यांच्यासाठी संक्रमण शिबिरातील उपलब्ध गाळे राखीव ठेवले जातील. मागणीप्रमाणे रहिवाशांना गाळे वितरित करून स्थलांतरित करण्यात येईल. धोकादायक इमारतीमधील घर रिकामे न करणाऱ्या रहिवाशांच्या विरोधात निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे.