लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचा ई-मेल आल्याची घटना ताजी असताना मुंबई पोलिसांना खोटी माहिती देणारे व धमकीच्या संदेशांमध्येही प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी अथवा ई-मेलद्वारे खोटी माहिती देणारे १०० हून अधिक प्रकरणे घडली आहेत. त्यातील बहुसंख्य गुन्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

१५ ऑक्टोबर रोजी कुलाबा येथील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये बॉम्ब फेकायला जात आहे. काय करायचे ते करा, असा दूरध्वनी करणाऱ्या ३६ वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली. आरोपीने अग्निशमन दलाच्या १०१ क्रमांकावर दूरध्वनी करून वरील धमकी दिली होती. यापूर्वी आरोपी मुख्य नियंत्रण कक्षाला २८ वेळा दूरध्वनी केला होता. धरमपाल अमरपाल सिंह असे अटक आरोपीचे नाव होते. त्यापूर्वी १४ ऑक्टोबर रोजी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) इमारतीत बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देणाऱ्या बिमेश मायाराम यादव (३०) याला पोलिसांनी अटक केली होती. या वर्षभरात मुंबई पोलिसांना शंभर हून अधिक वेळा खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे दूरध्वनी आले आहेत.

आणखी वाचा-मुंबई : गोवंडीमध्ये महिलेवर चाकूहल्ला

काही दिवसांपूर्वी मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनला आला होता. निनावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली. निनावी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलणे करुन देण्याची इच्छा केली व्यक्त केली. बोलणे करून दिले नाही, तर बॅाम्बने मंत्रालय उडवून देण्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर मंत्रालयात बॅाम्बशोध पथक दाखल झाले. त्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील परिसराची विशेष तपासणी केली. नागरिकांनाही तेथे जाण्यापासून रोखण्यात आले होते. सुमारे दीड तास तपासणी केलानंतर मंत्रालयात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. याप्रकरणी पाथर्डी येथून एका संशयीताला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच दक्षिण मुंबईतील एका महिलेने ३८ वेळा दूरध्वनी करून पोलिसांना त्रास दिला होता. याशिवाय मानसिक स्थिती ठीक नसलेल्या एका महिलेने ११० वेळा मुंबई पोलिसांना दूरध्वनी करून खोटी माहिती दिली होती. अशा घटनांमुळे पोलीस यंत्रणांवर विनाकारण ताण येतो.

याबाबत माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणांमध्ये खोटी माहिती प्रसारित करणे अथवा धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल होतात. आरोपींना अशा प्रकरणांमध्ये लवकर जामीन मिळतो. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये कठोर कायदे करण्याची आवश्यकता असून त्याबाबत अभ्यास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than a hundred cases of false information and threatening telephone calls have been reported mumbai print news mrj