मुंबई : बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या मुंबईसाठी चिंतेचा विषय ठरत असून यामुळे सामाजिक आणि आर्थिक घटकांवरही भार पडत आहे. रोजगार व अन्य कारणांमुळे बांगलादेशातून मुंबईत येणाऱ्या नागरिकांवर पोलीस सातत्याने कारवाई करत आहेत. गेल्या तीन वर्षात एक हजारहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, २५९ नागरिकांना परत बांगलादेशात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, संबंधितांना भारतात राहण्यास मदत करणाऱ्या १२ भारतीय नागरिकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षात बांगलादेशातून भारतात येणाऱ्या नागरिकांची घुसखोरीची प्रकरणे सतत समोर येत आहेत. अनेक घुसखोर चोरी, दरोडे, अंमली पदार्थांची तस्करी आदी गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचेही यापूर्वी उघड झाले आहे. बांगलादेशातून येणारे अनेक घुसखोर बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड आणि पॅन कार्ड तयार करून बेकायदेशीररीत्या भारतात राहतात. या घुसखोरांना आवश्यक कागदपत्रे बनवून देण्यात अनेकदा भारतीय नागरिकच मदत करतात.

शिवाय, हे घुसखोर झोपडपट्टी परिसरात राहत असल्याने त्यांची ओळख पटणे लवकर शक्य होत नाही. मात्र, असे असले तरीही मुंबईतील सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखा तसेच ए.टी.एस व एन.आय.ए. यांच्यामार्फत नियमितपणे घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात येते. त्यानुसार गेल्या तीन वर्षात १ हजार १७३ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, २५९ घुसखोरांनी परत त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक अटक २०२५ वर्षात करण्यात आल्या आहेत.

देशातील व्यवस्थांवर अतिरिक्त ताण

बांगलादेशी घुसखोरांमुळे भारतातील आरोग्य सेवा, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येत आहे. घुसखोर नागरीक भारतातील नैसर्गिक साधनसामुग्रीचा व सार्वजनिक व्यवस्थेचा वापर करून कमवलेले उत्पन्न मायदेशी पाठवितात. ते कोणताही कर देत नाहीत. तसेच, घुसखोरीमुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे. घुसखोरांवर कारवाई होत असली, तरी त्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहायला हवे, असे मत माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष घोलप यांनी व्यक्त केले आहे.