लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : आरटीईअंतर्गत होणाऱ्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबईतून पाच हजारहून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश २८ फेब्रुवारीपर्यंत निश्चित करावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी १४ जानेवारीपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. हे प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला २७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर प्रवेश अर्ज स्वीकारण्याची मुदत २ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली. त्यानुसार, पहिल्या फेरीत ५ हजार १५७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मुंबईतील एकूण ३२७ शाळा यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या आहेत. या शाळांमध्ये एकूण ६ हजार ५३ जागा आहेत. पुढील फेऱ्यांमध्ये उर्वरित जागांचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी दिले. तसेच विभागानुसार एकूण तीन याद्या जाहीर करण्यात येतात. पालकांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर आणि यादीतील विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित केल्यानंतर उर्वरित जागा पुढच्या दोन फेऱ्यांमध्ये भरल्या जातील, असेही गणपुले यांनी सांगितले. दरम्यान, १४ जानेवारी ते २ फेब्रवारी या कालावधीत संपूर्ण मुंबईतून अंदाजे १५ हजार अर्ज प्राप्त झाले.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने नुकतेच प्राथमिक शिक्षण संचालकांना २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रवेश प्रक्रिया मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मागील वर्षी प्रवेश प्रक्रिया विलंबाने झाल्याने अनेक विद्यार्थी मोफत शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहिले होते. यंदा प्रक्रियेला विलंब झाल्यास याबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र विद्यार्थी, पालक आणि शिक्षक महासंघाचे अध्यक्ष नितीन दळवी यांनी दिला आहे.
निवड झालेल्या बालकांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तालुका आणि प्रभाग स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. पडताळणी समितीकडे जाताना पालकांना मुळ कागदपत्रे आणि एक छायांकित प्रत घेऊन जावे. पालक दिलेल्या तारखेस कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत, तर त्यांना पुन्हा दोन संधी दिल्या जाणार आहेत. पडताळणी समितीने विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून प्रमाणित केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सुविधा आरटीई संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. तसेच पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गटशिक्षणाधिकाऱ्यांचे स्वाक्षरीचे पत्र घेऊन शाळेत जातील. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार नाही. पालकांनी केवळ दूरध्वनीवरील संदेशावर अवलंबून न राहता आरटीई संकेतसथ्ळावर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला आणि ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्या प्रकरणी आरटीई २५ टक्के प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येतील.