मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मंडाळामधील अणुशक्ती नगर आणि वांद्रे येथील गांधी नगरातील विकासाआड येणाऱ्या वृक्षांची कत्तल आणि पुनरेपण करण्यास परवानगी दिली असून त्यामुळे तब्बल ९०२ झाडांवर गंडांतर येणार आहे. या वृक्षसंपदेच्या संरक्षणासाठी सदस्यांकडून प्रस्तावाला विरोध केला जाईल असे वाटत होते. परंतु विकासकांवर मेहेरनजर करीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
अणुशक्ती नगर येथे एक टोलेजंग इमारत बांधण्यात येणार असून या बांधकामाआड तब्बल ५०४ झाडांचा अडथळा निर्माण झाला आहे. काही झाडे तोडणे आणि काहींचे पुनरेपण करण्यास परवानगी मिळावी यासाठी विकासकाने ३० सप्टेंबर २०१४ रोजी पालिकेला पत्र सादर केले होते. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून ५०४ पैकी ४८ झाडे ‘जैसे थे’ ठेवण्याचा आणि ४५६ वृक्षांचे पुनरेपण करण्याचा निर्णय घेतला.
वांद्रे येथील गांधी नगरमधील एमआयजी ग्रुप को-ऑप. हौसिंग सोसायटी ग्रुप-१ मधील प्रस्तावित इमारतीच्या बांधकामामध्ये ४४६ झाडांचा अडथळा निर्माण झाला होता. झाडे तोडणे आणि पुनरेपणासाठी परवानगी मिळावी म्हणून विकासकाने २३ सप्टेंबर २०१३ रोजी पालिकेला पत्र सादर केले होते. अधिकाऱ्यांनी पाहणी करून ११३ झाडे तोडण्यास व ३३३ झाडांचे पुनरेपण करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या शुक्रवारच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. मुंबईतील वृक्षसंपदेची जपणूक करण्याच्या दृष्टीकोनातून या प्रस्तावास सदस्यांकडून विरोध होईल अशी अपेक्षा होती. परंतु दोन्ही प्रस्तावांना बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आंबा, नारळ, बदाम, चिंच, करंज, गुलमोहर, शेवर, धामण आदी झाडांचा बळी जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा