मुंबईमध्ये ४७७६ पैकी तब्बल ७५ टक्के म्हणजे ३६१८ मोबाइल टॉवर अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एम-पूर्व आणि एम-पश्चिम विभागांत सर्वाधिक म्हणजे ९५ टक्के मोबाइल टॉवर अनधिकृत असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र अनधिकृत टॉवरविरुद्ध कारवाई करण्याबाबत पालिकेने अद्याप कोणतीही हालचाल सुरू केलेली नाही.
मुंबईमधील इमारतींच्या गच्चीवरील मोबाइल टॉवरमुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याची तक्रार करीत भाजप नगरसेवक विनोद शेलार यांनी ५ नोव्हेंबर २०१२ रोजी पालिका सभागृहात प्रशासनावर ताशेरे मारले होते. त्या वेळी सर्वच नगरसेवकांनी मोबाइल टॉवरबाबत नवे धोरण आखण्याची मागणी केली होती. त्या वेळी मुंबईत किती मोबाइल टॉवर आहेत याची माहितीही प्रशासनाकडे नव्हती. दरम्यानच्या काळात चित्रपट अभिनेत्री जुही चावला आणि समाजसेवक प्रकाश मुन्शी यांनी आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेऊन मोबाइल टॉवरबाबतचे धोरण जाहीर करण्याची विनंती केली होती. एक वर्ष लोटले तरी प्रशासनाकडून मुंबईतील मोबाइल टॉवरची संख्या जाहीर करण्यात चालढकल होत होती. पुन्हा एकदा विनोद शेलार यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करून सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला. अखेर मंगळवारी प्रशासनाने मोबाइल टॉवरची आकडेवारी जाहीर केली.
मुंबईत एकूण ४,७७६ मोबाइल टॉवर असून त्यांपैकी तब्बल ३,६१८ टॉवर अनधिकृत आहेत. पालिकेच्या एम- पूर्व आणि एम- पश्चिम विभागांमध्ये अनुक्रमे ८२ व ११७ टॉवर आहेत. त्यांपैकी अनुक्रमे केवळ चार व पाच टॉवर अधिकृत असल्याचे आढळून आले आहे. या विभागांमधील ९५ टक्के मोबाइल टॉवर अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. तसेच डी विभागात ३६३ पैकी ३३३ मोबाइल टॉवर अनधिकृत आहेत. अनधिकृत मोबाइल टॉवरची संख्या पाहता पालिका अधिकारी त्याकडे कानाडोळा करीत असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप विनोद शेलार यांनी केला आहे. अनधिकृत मोबाइल टॉवरला आशीर्वाद असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2013 रोजी प्रकाशित
मुंबईत साडेतीन हजारांहून अधिक मोबाइल टॉवर अनधिकृत!
मुंबईमध्ये ४७७६ पैकी तब्बल ७५ टक्के म्हणजे ३६१८ मोबाइल टॉवर अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एम-पूर्व

First published on: 25-12-2013 at 04:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More then three and a half thousand unauthorized mobile towers in mumbai