गणेशोत्सवात मुंबईबाहेर जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी सहा जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या सहा गाडय़ांचे आरक्षण आज, २९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यातील तीन गाडय़ा मुंबईबाहेर जातील, तर तीन मुंबईच्या दिशेने येणार आहे. या सहापैकी चार फेऱ्या कोकणासाठी आहेत. याच वेळी एसटी महामंडळानेही १८०० जादा बसेस गणेशोत्सवासाठी रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी १७३२ गाडय़ांचे आरक्षण याआधीच झाले असून उर्वरित गाडय़ांचे आरक्षण सुरू आहे.
मध्य रेल्वेने यंदा शंभराहून अधिक जादा फेऱ्या गणेशोत्सवादरम्यान जाहीर केल्या होत्या. त्यातच मध्य रेल्वेने तीन आणखी गाडय़ा सोडण्याचे ठरवले आहे. यापैकी ०१२०३ डाऊन छत्रपती शिवाजी टर्मिनस ते सावंतवाडी ही गाडी ९ सप्टेंबर रोजी ००.४० वाजता सुटेल. ही गाडी दुपारी २.४० वाजता सावंतवाडीला पोहोचणार आहे. ०१२०४ अप ही विशेष गाडी सावंतवाडीहून ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता निघून १० सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजता मुंबईला पोहोचेल. या गाडीला २१ डबे असतील. त्यापैकी १२ डबे शयनयान श्रेणीचे असून ५ द्वितीय श्रेणीचे आहेत.
कोकणात जाणारी ०१२०१ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी ही दुसरी गाडी ६ सप्टेंबर रोजी ०१.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघणार आहे. ही गाडी सावंतवाडी येथे त्याच दिवशी दुपारी २.४० वाजता पोहोचेल. ०१२०२ अप सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता सावंतवाडीहून निघून ७ सप्टेंबरला पहाटे २.२० वाजता मुंबईत पोहोचेल. ही गाडी १५ डब्यांची असून त्यात शयनयान श्रेणीचे ९ आणि द्वितीय श्रेणीचे तीन डबे असतील.
मध्य रेल्वेची तिसरी गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या दरम्यान धावणार आहे. ०१२०५ ही डाउन गाडी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल. तर ०१२०६ अप ही गाडी ७ सप्टेंबर रोजी कोल्हापूरहून सकाळी ९.०५ मिनिटांनी निघून ८ सप्टेंबर रोजी ००.२० वाजता मुंबईत पोहोचेल. या गाडीला १५ डबे असून त्यापैकी १० शयनयान श्रेणी आणि तीन द्वितीय श्रेणीचे असतील.
गणेशोत्सवात मुंबईबाहेर जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी सहा जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळ १८०० जादा बसेस सोडणार आहे.
गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या जादा फेऱ्या
गणेशोत्सवात मुंबईबाहेर जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी सहा जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
First published on: 29-08-2013 at 03:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More train and st buses to konkan for ganesh festival