नागपूर समृद्धी महामार्गावर फूड प्लाझा आणि इतर सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निविदा मागविल्या होत्या. मात्र, या निविदेला प्रतिसादच न मिळाल्याने फेरनिविदा काढण्याची नामुष्की एमएसआरडीसीवर ओढावली आहे. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावरील आवश्यक त्या सोयी सुविधांची प्रतीक्षा लांबली आहे.
डिसेंबरमध्ये समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला आहे. मात्र, या महामार्गालगत खानपान सुविधा, प्रसाधन गृह, गॅरेज आणि इतर सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे, प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसी आणि सरकारने उद्घाटनाची इतकी घाई का केली? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यानंतर एमएसआरडीसीने महामार्गालगतच्या पेट्रोल पंपावर खानपान आणि इतर सुविधा तात्पुरत्या स्वरुपात पुरविल्या आहेत. पण त्या पुरेशा नाहीत.
हेही वाचा – INS Vagir पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल, भारताचे समुद्रातले सामर्थ्य वाढले
दरम्यान ७०१ किमीच्या संपूर्ण महामार्गावर फुड प्लाझा आणि इतर सुविधा पुरविण्यासाठी एमएसआरडीसीने डिसेंबरमध्येच निविदा मागविल्या आहेत. मात्र या निविदेला शून्य प्रतिसाद मिळाल्याने निविदेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आता २० फेब्रुवारी अशी निविदा सादर करण्याची अंतिम मुदत आहे. तेव्हा दुसऱ्यांदा तरी निविदेला प्रतिसाद मिळतो का हे पाहणे आवश्यक असणार आहे. दुसऱ्यांदा प्रतिसाद मिळाला नाही तर निविदेत काही बदल करत पुन्हा निविदा काढावी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.