मुंबई : कोलमडलेले वेळापत्रक आणि दिरंगाईमुळे लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील मानखुर्द आणि वाशी स्थानकांदरम्यान शनिवारी सकाळी गर्दीच्या वेळी ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळित झाली. या तांत्रिक बिघाडामुळे जवळपास दोन तास प्रवाशांचा खोळंबा झाला आणि ऐन सकाळी कामावर पोहोचताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरील मानखुर्द आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर तात्काळ ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान, या कालावधीत काढलेल्या त्याच तिकीट आणि पासचा वापर करून ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची प्रवाशांना परवानगी देण्यात आली होती. तसेच ओव्हरहेड वायर दुरुस्त होईपर्यंत प्रवाशांना ट्रान्सहार्बरमधून प्रवास करता येईल. तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावरून देण्यात आली. ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळी ९.४० च्या सुमारास हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.

हेही वाचा…म्हात्रेंना अंतरिम संरक्षण

दरम्यान, मानखुर्द आणि वाशी स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. या तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत होती. परिणामी, विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. काही लोकल स्थानकांवर, तर काही लोकल दोन स्थानकांदरम्यान उभ्या होत्या. यामुळे प्रवासी संतप्त झाले होते. कामावर जाणाऱ्या प्रवाशांना कार्यालयात वेळेत पोहोचता आले नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morning rush disrupted as overhead wire breaks between mankhurd and vashi delaying commuters on harbor line mumbai print news psg