आतापर्यंत विधानसभा, जिल्हा परिषदा, नगरपालिकांमध्ये विजय मिळाल्यावर आपण आनंदोत्सव साजरा केला. आता २०१४ मध्ये राज्यात सर्वाधिक जागाजिंकून गुलालाने न्हाऊन निघू या, असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची आपली इच्छा आज जाहीरपणे व्यक्त केली. राज्यात अजितदादा काँग्रेसवर कुरघोडी करीत असतानाच, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रेरणेतून आलेल्या अन्नसुरक्षा कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल, या मताचा पुनरुच्चार करीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतील काँग्रेसवर तोफ डागली. राज्यात काँग्रेसने राष्ट्रवादीच्या विरोधात मोहिम उघडल्यानेच बहुधा पवार काका-पुतणे काँग्रेसच्या विरोधात आक्रमक झाल्याचे बोलले जात
आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या, अद्ययावत कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी शरद पवार यांच्या हस्ते झाले. पवार यांच्यासह अजितदादा, प्रफुल्ल पटेल, मधुकरराव पिचड, छगन भुजबळ या सर्वानीच या प्रसंगी काँग्रेसला यथेच्छ डिवचण्याचा प्रयत्न केला. आता खूप झाले, स्वबळावर लढण्याची परवानगी द्या, अशी भूमिका प्रदेशाध्यक्षांनी मांडताच अजित पवार यांनी मुद्दय़ालाच हात घातला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावरून राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. आता २०१४ मध्ये राष्ट्रवादीला सत्ता मिळालीच पाहिजे, असे अजितदादांनी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांना बजावले. राष्ट्रवादीचा निधर्मवादी ढाचा कायम राहिला पाहिजे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवण्याची तयारी आहे. पण कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला नं. १ मिळालाच पाहिजे, असे सांगत सिंचन घोटाळ्यांच्या आरोपांमुळे मधल्या काळात काहीशी बचावात्मक भूमिका घ्यावी लागलेल्या अजितदादांनी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे संकेत दिले.
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही अजित पवार यांचीच री ओढली. असे झाल्याने शरद पवार यांनी मोठी जबाबदारी मिळण्यास मदत होईल, असा पटेल यांचा दावा असला तरी त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख करण्याचे टाळल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भुवया साहजिकच उंचावल्या.
काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने करण्यात येणाऱ्या अन्न सुरक्षा कायद्यावर शरद पवार यांनी पुन्हा एकदा टीका केली. गहू खरेदीसाठी सरकारला किलोला १८ रुपये खर्च येतो. हाच गहू देशातील ६८ टक्के जनतेला २ रुपये किलो दराने दिल्यास सरकारवर त्याचा बोजा पडेल. किती सवलत द्यायची याचा विचार झाला पाहिजे. मोफत मिळते म्हटल्यावर लोकांना त्याची किंमत कळत नाही. एवढय़ा कमी किंमतीत धान्य उपलब्ध झाल्यास त्याचा परिणाम शेतीमालाच्या भावावर होईल. यातून शेतकऱ्यांचेच नुकसान होईल, असे पवार म्हणाले.  
लोकप्रियता मिळवायला हरकत नाही. पण त्यासाठी किती टोकाला जायचे याचे तारतम्य बाळगायला हवे. अन्यथा सरकारची अवस्था वाईट होईल, असे सांगत पवार यांनी काँग्रेसला चिमटा काढला. दारिद्रय़रेषेखालील लोकसंख्या दोन टक्क्य़ांनी घटल्याचे पंतप्रधानांचीच जाहीर केले. एका बाजूला दारिद्रय़रेषेखालील लोकांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे किती जणांना सवलत द्यायची, असा सवालही त्यांनी केला.    
काकाने घेतली पुतण्याची बाजू
राजीनामा नाटय़ापासून काका-पुतण्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होत असतानाच सिंचन प्रकल्पावरून शरद पवार यांनी पुतणे अजितदादांची प्रथमच बाजू घेतली. महाराष्ट्रात सिंचनाचे मोठय़ा प्रमाणावर प्रकल्प रखडल्याची चर्चा होते. पण केंद्रातील संबंधित खात्याकडून माहिती मागविली असता शेजारील काही राज्यांमध्ये ४० वर्षे झाली तरी प्रकल्प पूर्ण झालेले नसल्याचे आढळून आले आहे. १५० कोटींच्या प्रकल्पांचा खर्च १५ हजार कोटींवर गेल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा