अपघात, तस्करी, निरनिराळ्या गुन्ह्य़ांमध्ये वापरलेली आणि चोरीची असंख्य वाहने ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये धूळ खात पडली असून पावसाळ्यामध्ये ही वाहने डासांचे उत्पत्तिस्थान बनत आहेत. कित्येक दिवस एकाच ठिकाणी पडून असलेल्या या वाहनांमध्ये पावसाचे पाणी साचून तेथे डासांचा प्रसार वाढून मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांना बळ मिळत आहे. त्यामुळे दर आठवडय़ाला या गाडय़ांमध्ये कीटकनाशकांची फवारणी करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. न्यायालयीन प्रकरणांमुळे या वाहनांची विल्हेवाट लावणे पोलिसांनाही अशक्य बनले आहे.

मुंबईत घडणाऱ्या विविध गुन्ह्य़ांमध्ये वापरलेली वाहने, तसेच अपघातग्रस्त गाडय़ा जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात अथवा पोलीस दलाच्या भूखंडावर ठेवल्या जातात. गुन्हा अथवा अपघातातील या गाडय़ांची प्रकरणे न्यायालयात सुरू आहेत. ही वाहने प्रकरणांमध्ये पुरावा मानली जात आहेत. त्यामुळे पोलिसांना ती तशीच ठेवावी लागत आहेत. पावसाळ्यात या वाहनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर डासांच्या अळ्या वाढत असल्याचे दिसून आल्यानंतर दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी शक्य तितक्या गाडय़ांची विल्हेवाट लावण्याची, तसेच संबंधित मालकांना ती देण्यावर भर दिला होता. मात्र तरीही आजघडीला अनेक पोलीस ठाण्यांच्या आवारात अनेक गाडय़ा पडीक आहेत.

चाकांमध्ये हवाच नाही, फुटलेल्या काचा अशा अवस्थेत ही वाहने आहेत. या गाडय़ा सुरू होऊ शकत नाहीत अशा स्थितीत आहेत. धक्का मारून त्या एका कोपऱ्यात नेऊन ठेवणेही अवघड आहे. काचा फुटल्या असल्याने वाहनांमध्ये पावसाचे पाणी जात असून त्यात डासांच्या अळ्यांची पैदास होत आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव होऊन साथीच्या आजारांना आयते आमंत्रण मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हिवताप, डेंग्यू, झिका या साथीच्या आजारांचा प्रादुर्भावर डासांमुळे होतो. वर्षांनुवर्षे पोलीस ठाण्यांच्या आवारात पडीक बनलेली वाहने डासांची उत्पत्तिस्थाने बनली होती. त्यामुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी, तसेच आसपासच्या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला होता. परिणामी, न्यायालयीन प्रकरणांमध्ये पुरावा असलेल्या या वाहनांचा विचार करण्याची वेळ आली आहे.

– राजन नारिंग्रेकर, कीटकनाशक अधिकारी, कीटकनियंत्रण विभाग

Story img Loader