इंद्रायणी नार्वेकर

संपूर्ण मुंबईत सध्या अंधेरी पूर्वमध्ये सर्वात जास्त रुग्ण असले तरी सक्रिय म्हणजे उपचाराधीन रुग्णांची संख्या मालाडमध्ये जास्त असल्याचे आढळून आले आहे. दरदिवशी या भागात १००च्या पुढे रुग्णांची नोंद होत असून उच्चभ्रू इमारतींमध्ये आता मोठय़ा प्रमाणावर रुग्ण सापडू लागले आहेत. घरीच विलगीकरणात रुग्ण असलेल्या इमारतींमध्ये मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आढळत असल्यामुळे गृह विलगीकरणाऐवजी अशा रुग्णांना पालिकेच्या विलगीकरण केंद्रात ठेवले जाणार आहे.

मुंबईत सध्या सुमारे २४ हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे सुमारे २००० रुग्ण हे मालाडमधील आहेत. मालाड परिसरात दररोज १०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. मृत्यूदर ३.८ इतका तुलनेने कमी असला तरी वाढती रुग्णसंख्या हे चिंतेचे कारण आहे. सुरुवातीला झोपडपट्टय़ा आणि बैठय़ा चाळींपुरता असलेला करोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांत इमारती, एसआरएच्या इमारती, उच्चभ्रू सोसायटय़ांमध्ये पोहोचला. दरदिवशी सापडणाऱ्या रुग्णांपैकी ८० टक्के इमारतीतील असतात. आप्पा पाडा, कुरार गाव येथील रुग्णवाढ आता बऱ्यापैकी आटोक्यात आहे, पण इमारतींमध्य रुग्ण वाढू लागले आहेत.

Story img Loader