लोकसत्ता विशेष प्रतिनिधी,

मुंबई : देशांतील ६० शहरांत एकूण विक्री झालेल्या घरांची संख्या २३ टक्क्यांनी वाढलेली असताना, रिक्त घरांच्या संख्येत वर्षागणिक भर पडत आहे. या रिक्त घरांपैकी ८० टक्के घरे मोठ्या शहरांमध्ये आहेत. छोट्या शहरांमध्ये घरांच्या विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे.

‘कन्फेडरेशन ॲाफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स ऑफ इंडिया’मार्फत (क्रेडाई) देशभरातील विकासकांची सहावी ‘न्यू इंडिया समीट’ ही परिषद नाशिक येथे अलीकडे पार पडली. या परिषदेत ‘क्रेडाई’ व ‘लायसेस फोरास’ यांनी संयुक्तपणे देशातील ६० शहरांतील गृहनिर्माणाबाबत सादर केलेला अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यात घरांच्या वस्तुस्थितीबाबत माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, गेल्या वर्षांत ६० शहरांमध्ये सहा लाख ८१ हजार १३८ घरांची विक्री झाली. २०२३ च्या तुलनेत ही वाढ २३ टक्के असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. मात्र विकल्या न गेलेल्या घरांची संख्या १० लाखांहून अधिक आहे. हे प्रमाण ४३ टक्के आहे. मोठ्या शहरांत रिक्त घरांची संख्या ८० टक्के असल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

‘न्यू इंडिया समीट’ ही परिषदेत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ‘क्रेडाई’ला उद्देशून म्हणाल्या की, तुम्ही आहात म्हणून छत आहे, लोकांना काम आहे. हे असेच सुरू ठेवा. ‘रिअल इस्टेट’ या शब्दाला वाईट अर्थ आहे. तो बदलण्याचा तुम्ही प्रयत्न केला का? देशाला उभारण्यात तुमचा वाटा आहे, असे दिसून यायला हवे. क्रेडाईने या शब्दाला नवा अर्थ देण्याची गरज आहे. इमारती वा टॉवर उभारताना ‘डेटा सेंटर’ निर्माण करण्याचाही विचार केला पाहिजे. देशात १८ दशलक्ष चौरस फूट इतक्या डेटा सेंटरची गरज आहे, असेही इराणी यांनी या वेळी अधोरेखित केले.

येत्या काही वर्षांत १० लाख लोकसंख्या असलेली १०० शहरे विकसित होणार आहेत. या शहरांना घरांची गरज आहे आणि सध्या विकासकांच्या रडारवर देशातील अनेक छोटी शहरे आली आहेत. लोकही गरजा कमी करण्यासाठी मोठ्या शहरांतून छोट्या शहरात जाऊ पाहत आहेत. मोठ्या शहरांप्रमाणेच या लोकांना घरे हवी आहेत. विकासकांनीही त्या दिशेने विचार केला पाहिजे. -स्मृती इराणी, माजी केंद्रीय मंत्री

देशातील दुसऱ्या व तिसऱ्या वर्गातील शहरांमधील सुमारे तीन हजार २९४ एकर भूखंडापैकी ४४ टक्के भूखंड खासगी विकासकांनी विविध प्रकारे संपादित केले आहेत. पुढील काही वर्षांत हे भूखंड विकसित होणार आहेत. -बोमन इराणी, अध्यक्ष, क्रेडाई

Story img Loader