नमिता धुरी
टाळेबंदीचा फटका सर्वसामान्य मुलांसोबतच स्वमग्न, गतिमंद आणि विशेष मुलांनाही बसला आहे. या मुलांची शाळा, उपचार, व्यायाम बंद झाल्याने त्यांच्यात अस्वस्थता, निद्रानाश वाढताना दिसत आहे. त्यांचे मन रमवण्यासाठी सोपे खेळ, कला आदी गोष्टींचा आधार पालक घेत असले तरी त्यांची सर्वाधिक घुसमट होत असल्याचे समोर येत आहे.
चिंचपोकळीच्या चाळीत राहणारा नऊ वर्षीय आदेश स्वमग्न आहे. एरवी दुपारच्या वेळेत शाळेत त्याला हवे तसे बागडता येत असे. त्यामुळे तो दिवसभर प्रसन्न असे. गेले काही दिवस तो घरीच असल्याने त्याची चिडचिड वाढल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. घर लहान असल्याने त्याला घरात खेळता येत नाही आणि सध्याच्या परिस्थितीत गावातही पाठवता येत नाही, याबाबत त्याचे वडील प्रकाश भिसे यांनी हतबलता व्यक्त केली. त्याला आता झोप लागत नसल्याचेही त्यांनी सांगितले. नेरुळचा सहा वर्षीय अध्ययन सिंगही स्वमग्न आहे. त्याला बागेत फिरायला जावेसे वाटते. मात्र ते शक्य नसल्याने घरातच इतर खेळात गुंतवून ठेवत असल्याची माहिती त्याचे वडील सतीशकु मार यांनी दिली. गतिमंद मूल असणाऱ्या पालकांचीही अवस्था काही प्रमाणात अशीच आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांवर अधिक ताण येत आहे.
विशेष मुलांसाठी मार्गदर्शक चित्रफिती
विशेष मुलांनी इतरांशी संवाद साधावा, त्यांच्यात मिसळावे यासाठी त्यांना संवादकौशल्य शिकवण्याचे काम उपचार के ंद्रे करतात. या मुलांना स्वावलंबी करण्यासाठी मार्गदर्शक चित्रफिती तयार करून पालकांना पाठवत असल्याची माहिती ‘उम्मीद चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर’च्या डॉ. रूपा श्रीनिवासन यांनी दिली. झूम, स्काइप, व्हिडीओ कॉल या माध्यमातूनही पालकांशी संवाद साधला जात आहे.
मुलांना खूप खेळणी एकाच वेळी देऊ नयेत. एखादे खेळणे देऊन त्यावरच लक्ष एकाग्र करू द्यावे. घरातील छोटी-छोटी त्यांना जमतील अशी कामे करून घ्यावीत. मुलांचे बौद्धिक वय लक्षात घेऊन त्यानुसार खेळ खेळावेत.
– डॉ. रूपा श्रीनिवासन, उम्मीद चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर