शैलजा तिवले
जंकफूडचे वाढते प्रमाण, खाण्याच्या अनियमित वेळा, पोषण आहाराची कमतरता आणि व्यायामाचा अभाव यामुळे राज्यात पाच वर्षांखालील बालकांमध्ये स्थूलतेचे प्रमाण गेल्या काही वर्षांत जवळपास दुप्पट झाल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस ५) अहवालातून अधोरेखित झाले आहे.
प्रामुख्याने मुंबई, नागपूर या शहरांत ते सर्वाधिक म्हणजे १० टक्क्य़ांपर्यत आढळले आहे. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी या भागात स्थूल बालकांचे प्रमाण अवघे एक ते दोन टक्के होते.
मुंबई वगळता सर्वच जिल्ह्य़ात स्थूल बालकांचे प्रमाण एनएफएचएस ४च्या अहवालानुसार एक ते तीन टक्क्य़ांदरम्यान होते. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे पोषक आहाराची जागा जंकफूडने घेतली. त्याचे परिणाम आता पाच वर्षांखालील बालकांमध्ये दिसून येत आहेत. स्थूल बालकांची टक्केवारी बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये चार टक्क्य़ांपर्यंत पोहोचली आहे. मुंबई उपनगरात सर्वाधिक स्थूल बालकांची नोंद झाली असून हे प्रमाण दोन टक्क्य़ांवरून १० टक्क्य़ांपर्यत वाढले आहे. नागपूरमध्ये स्थूल बालकांची संख्या झपाटय़ाने वाढली असून एक टक्क्य़ावरून थेट १० टक्क्य़ांवर गेली आहे. सिंधुर्दुगातही हा आलेख एक टक्क्य़ावरून ६ टक्क्य़ांवर गेला आहे.
आपले मूल स्थूल आहे हेच पालकांच्या लक्षात येत नाही. परिणामी आहारासह इतर बाबींच्या नियोजनावर भर दिला जात नसल्याने भविष्यात ही मुले स्थूलच राहण्याची शक्यता अधिक आहे. तरुणपणातच अशा मुलांना उच्च रक्तदाब, मधुमेह इत्याही आजार जडण्याचा धोकाही अधिक आहे. जनुकीयरित्या स्थूलपणा असण्याचे प्रमाणही आता जवळपास १० टक्के आढळत आहे. त्यामुळे अशा बालकांचे निदान करून वजन नियंत्रित राहण्यासाठी वेळेत प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. अभय अग्रवाल यांनी व्यक्त केले.
अहवालातील नोंदींवर शंका
कुपोषणावर काम करणाऱ्या संस्थांनी या अहवालातील नोंदीवरच शंका घेतली आहे. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेचे डॉ. सतीश गोगुलवार यांनी, आदिवासी बहुल भागांमध्ये आत्तापर्यंत आम्ही एकही मूल स्थूल पाहिलेले नाही. उलट कुपोषणच अधिक वाढलेले दिसते. पण सर्वेक्षणात गडचिरोलीत स्थूल बालकांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. त्यामुळे या नोंदीविषयी शंका असून ‘एनएफएचएस’च्या या चुकीच्या नोंदींची राज्य सरकारनेही दखल घ्यायला हवी, अशी मागणी के ली. तर पालघरचे सामाजिक कार्यकर्ते ब्रायन लोबो यांनी, आदिवासी भागात आम्ही आत्तापर्यंत एकदाही कोणी सर्वेक्षणासाठी आल्याचे पाहिलेले नाही. त्यामुळे अशा प्रकारचे सर्वेक्षण या भागात होतात का याबाबतच शंका आहे, असे सांगितले.
स्वस्तातील जंकफूडवर अधिक भर
आपल्या आहारात गहू, तांदूळ याचा वापर अधिक असून भाज्या, फळे यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे साहजिकच उष्मांकाचे प्रमाण वाढत असून जीवनसत्त्वे आणि प्रथिने फार कमी प्रमाणात मिळतात. मूल जेवत नाही हीच तक्रार प्रत्येक आई करत असते. पण माझं मूल खेळत नाही, फळं खात नाही, अशा तक्रारी फारशा नसतात. खाण्यावर अतिरिक्त लक्ष केंद्रित केले जात असून मनोरंजन म्हणून पाहिले जाते. परंतु खाण्यातील पोषणतत्त्वांकडे दुर्लक्ष केले जाते. निकृष्ट दर्जाचे जंकफूड स्वस्तात उपलब्ध असून तुलनेत पौष्टिक वस्तू महाग आहेत. परिणामी जंकफूडच प्राधान्याने खाल्ले जाते. स्थूलता वाढण्याचे हे प्रमुख कारण आहे. बालकांमधील स्थूलता उच्च वर्गातच नव्हे तर शहरांमध्ये सर्वच स्तरामध्ये आढळून येत असल्याचे आहारतज्ज्ञ डॉ. शिल्पा जोशी यांनी सांगितले.
आदिवासी बहुल भागातही हाच प्रश्न
स्थूल बालकांची आत्तापर्यत नोंदच न झालेल्या गोंदिया, गडचिरोली, नाशिक या आदिवासी बहुल भागातही अनुक्रमे ८.३, ९.५ आणि २.२ टक्के बालके स्थूल असल्याचे या अहवालात मांडले आहे. पालघरमध्येही हे प्रमाण ९.३ टक्के, तर चंद्रपूरमध्ये ७.६ टक्के नोंदले आहे.
पाच टक्क्य़ाहून अधिक स्थूल बालकांचे प्रमाण (टक्क्य़ांत)
मुंबई उपनगर(१०.५), मुंबई शहर(६), ठाणे(५), सिंधुदुर्ग(६), सांगली(६.७), यवतमाळ(६.७), वाशिम (६.९), लातूर(५),अकोला (८.६)
पुण्यात मात्र घट
मुंबई, नागपूर या शहरांच्या पंक्तीत बसणाऱ्या पुण्यात मात्र स्थूल बालकांच्या प्रमाणात घट नोंदली आहे. २.९ टक्क्य़ावरून हे प्रमाण १.३ टक्क्य़ांपर्यत खाली आले आहे. जालना, हिंगोली, अहमदनगर यांमध्येही घट आहे.