सर्वात कमी लोकसंख्या गोरेगावमधील प्रभागात; २४ विभागांपैकी मालाड विभागाची लोकसंख्या अधिक

इंद्रायणी नार्वेकर

मुंबई : राज्य सरकारने लोकसंख्यावाढीच्या आधारे मुंबईतील प्रभाग व नगरसेवकांची संख्या नऊने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील सध्याच्या २२७ प्रभागांमध्ये लोकसंख्येचे प्रमाण कमीजास्त आहे. उपनगरांत लोकसंख्या वाढलेली असली तरी २०१७च्या निवडणुकीतील आकडेवारीनुसार सर्वाधिक लोकसंख्या दक्षिण मुंबईतील मशीद बंदरमधील प्रभागात आहे, तर सर्वात कमी लोकसंख्या पश्चिम उपनगरातील गोरेगावमधील प्रभागात असल्याचे दिसून आले आहे.

प्रभागांच्या सीमारेषा दर दहा वर्षांनी जनगणनेच्या आधारे बदलत असतात. २०११ मधील जनगणनेच्या आधारे २०१७ मध्ये प्रभागांच्या सीमारेषा बदलण्यात आल्या होत्या. साधारणत: पन्नास हजार लोकसंख्येमागे एक उमेदवार किंवा एक प्रभाग अशी ही रचना असते. या बदलांमुळे गेल्या निवडणुकीच्या वेळी शहर भागातील प्रभाग कमी झाले, तर उपनगरांतील प्रभाग वाढले होते. मात्र एकूण प्रभागांची संख्या २२७ होती. त्यामुळे मुंबईतील प्रभागांमध्ये ६० हजारांपासून ते ४५ हजारांपर्यंत अशी लोकसंख्येची मोठी तफावत आहे.

गेल्या जनगणनेच्या वेळी मुंबईतील लोकसंख्येच्या वाढीचा दर ३.८७ टक्के होता. त्याआधारे मुंबईतील ८.७८ टक्के म्हणजेच ९ प्रभाग वाढवण्यात येणार आहेत. मात्र हे नऊ प्रभाग वाढवताना लोकसंख्येच्या आधारे सर्वच प्रभागांना धक्का लागणार हे निश्चित आहे. मुंबईतील २४ विभागांचा विचार करता पश्चिम उपनगरांतील मालाडमध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. सर्वात मोठय़ा क्षेत्रफळाचा आणि लोकसंख्येची घनता अधिक असलेला हा विभाग आहे, तर सर्वात कमी लोकसंख्या मशीद बंदरचा भाग असलेल्या बी विभागाची आहे. मात्र प्रभागांचा विचार करता बी विभागातील प्रभागांमधील लोकसंख्या सर्वात जास्त आहे.

विभागांमध्येही बदल होण्याची शक्यता

लोकसंख्येच्या आधारे सर्व प्रभागांमधील लोकसंख्येची संख्या समान करण्याचा निर्णय घेतल्यास सर्व प्रभागांवर परिणाम होणार आहे. मात्र काही प्रभाग हे अन्य विभागांमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनाही आपला विभाग म्हणजेच वॉर्ड तोच राहणार की नाही हेदेखील बघावे लागणार आहे.

Story img Loader