ऐरोली सेक्टर १५ येथील अष्टविनायक सोसायटीत राहणाऱ्या नीता नितीन दिघोडे या महिलेने गुरुवारी रात्री उशिरा आपल्या अडीच वर्षांच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केली. तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले असले तरी मुलाची हत्या कशा प्रकारे झाली, हे स्पष्ट न झाल्याने पोलीस संभ्रमात आहेत.
तीन महिन्यांपूर्वी मुंबईतून ऐरोली येथे राहण्यास आलेल्या दिघोडे कुटुंबीयातील नितीन हा तरुण ताडदेव येथील आरटीओ कार्यालयात लिपिक म्हणून नोकरीस आहे. गुरुवारी रात्री तो घरी आला असताना नीताने पंख्याला गळफास लावून घेतल्याचे दिसून आले, तर जवळच अडीच वर्षांचा मुलगा सार्थक निपचित पडला होता. त्या वेळी रबाळे पोलिसांनी येऊन हे दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. शुक्रवारी या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नीताने गळफास लावल्याचे स्पष्ट झाले. पण सार्थकच्या शरीरावर कोणत्याही इजा नसल्याने त्याची हत्या कशा प्रकारे करण्यात आली याचा उलगडा पोलिसांनादेखील होत नाही. दरम्यान, नीताने लिहिलेल्या चिठ्ठीत तिच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, असे स्पष्ट लिहिले आहे. नीताचे आईवडील अमरावतीहून अद्याप आलेले नाहीत. तिच्या बहिणीने पोलिसांना दिलेल्या जबानीत आक्षेपार्ह आढळून आलेले नाही. कारण न समजल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे.