प्राजक्ता कदम
मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश
सहा वर्षांपूर्वी मुंबईहून चाकणला जाताना कोपरी येथे झालेल्या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सुगंध तळवडेकर (४५) या अभियंत्याच्या कुटुंबीयांना एक कोटी १० लाख ५४ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने ‘भारती अक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी’ला दिले आहेत.
सुगंध यांची पत्नी दीपाली यांनी या प्रकरणी भरपाईसाठी न्यायाधिकरणाकडे दावा दाखल केला होता. त्यावर निकाल देताना तळवडेकर कुटुंबीयांना एक कोटी १० लाख ५४ हजार रुपये भरपाईचे आदेश देण्यात आले. सुगंध हे लालबाग येथील पार्किंग्सन्स पॅकेजिंग कंपनीत वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. ७ जून २०१२ रोजी ते आणि त्यांचे सहकारी कामानिमित्त मुंबईहून चाकणला जात होते. प्रभंजन तावडे या सहकाऱ्याच्या गाडीने ते प्रवास करत होते. तावडे त्यांच्यासोबत जाणार नव्हते. मात्र त्यांनी गाडी सहकाऱ्यांना दिली होती. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून जाताना कोपरी गावाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी पुलाच्या कठडय़ावर आदळून खाली कोसळली. या भीषण अपघातात सुगंध यांच्यासह त्यांच्या एका सहकाऱ्याचाही मृत्यू झाला. सुगंध हे घरातील एकमेव कमावते होते आणि त्यांच्यावर पत्नी, दोन मुली आणि आईवडील अशा पाच जणांची जबाबदारी होती. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूने कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. त्यांची पत्नी दीपाली यांनी भरपाईसाठी न्यायाधिकरणाकडे गाडीचे मालक तावडे आणि विमा कंपनीविरोधात दावा दाखल केला.
अपघातग्रस्त गाडी ही तावडे यांच्या मालकीची होती आणि त्यांनी भारती अक्सा जनरल लिमिटेड या कंपनीकडून गाडीचा विमा उतरला होता. मात्र खासगी गाडी भाडय़ाने देता येत नाही, अशी अट असतानाही तावडे यांनी ही गाडी तळवडेकर यांना भाडय़ाने दिली होती. त्यामुळे विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी आमची नाही, असा दावा करत कंपनीने हात झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी भाडय़ाने घेतलेली नव्हती आणि कंपनीशी झालेल्या कुठल्याही कराराचे उल्लंघन करण्यात आले नव्हते. त्यामुळे कंपनी आपली जबाबदारी झटकू शकत नाही, हे दीपाली यांच्या वतीने अॅड्. नाना पवार आणि राजेश पवार यांनी न्यायाधिकरणाला पटवून देण्याचा प्रयत्न केला.
न्यायाधिकरणाचे दीपाली यांनी सादर केलेले साक्षीपुरावे ग्राह्य़ मानत कंपनीचे सगळे दावे फेटाळून लावले. तसेच सुगंध हे वरिष्ठ पदावर होते, त्यांना चांगला पगार होता आणि भविष्यात त्यांना बढतीच्या संधीही होत्या. ते कुटुंबातील एकमेव कमावते होते आणि त्यांच्या जाण्यामुळे कुटुंबीयांचा आधार गेला आहे, असे नमूद करत त्याचप्रमाणे सुगंध हे हयात असते तर त्यांना नोकरीमध्ये जे काही आर्थिक लाभ मिळू शकले या सगळ्याचा ताळेबंद आखून न्यायाधिकरणाने त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी १० लाख ५४ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले.
साक्षी-पुरावे
सुगंध हे पार्किंग्सन्स पॅकेजिंगमध्ये नोकरीला नव्हते, असा दावाही कंपनीतर्फे करण्यात आला. मात्र त्याचेही दीपाली यांच्याकडून खंडन करण्यात आले. तसेच सुगंध हे पार्किंग्सन पॅकेजिंगमध्येच नोकरीला होते हे सिद्ध करण्यासाठी त्यांचे नियुक्तीपत्र, मृत्यू झाला त्यावेळी ते कुठल्या पदावर कार्यरत होते, त्यांच्या वेतनाचा-प्राप्तिकराचा तपशील दीपाली यांच्याकडून न्यायाधिकरणाकडे सादर करण्यात आला. साक्षीदारही हजर करण्यात आले.