मुंबई : नाकाबंदीदरम्यान उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घालून त्यांना गंभीर जखमी केल्याचा प्रकार शनिवारी पहाटे कांजूरमार्ग परिसरात घडला. अपघातानंतर पोलीस उपनिरीक्षकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपी चालकाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीरेंद्र खवळे असे जखमी पोलिसाचे नाव आहे. ते पार्कसाईट पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
खवळे व त्यांचे पथक कांजूरमार्ग येथील हुमा मॉल परिसरात नाकाबंदीच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी एक पांढऱ्या रंगाची मोटरगाडी तेथे आली. पोलिसांनी चालकाला मोटारगाडी थांबवण्याचा इशारा दिला. त्यावेळी त्याने मोटरगाडी न थांबवता तिचा वेग वाढवला. चालकाने खवळे यांच्या अंगावर मोटारगाडी घातली व तो गांधी जंक्शनच्या दिशेने पळून गेला. या अपघातानंतर खवळे खाली कोसळले. त्यांना फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : राज्यात मुख्यमंत्री बदल होणार? तारीख सांगत विजय वडेट्टीवार म्हणाले, “मुख्य खुर्चीपासून…”
दुसरीकडे पोलीस नियत्रंण कक्षाला घटनेबाबतची माहिती देऊन आरोपी चालकाला पकडण्यासाठी मदत मागण्यात आली. बिट मार्शलही दुचाकीवरून मोटारगाडीचा पाठलाग करत होते. आरोपीने मोटारगाडी गांधी नगर येथून बिंदू माधव चौक, कांजूरमार्ग पूर्व, नाहूर पूर्व मार्गे भांडूपला नेली. एकता चौक येथे भांडूप पोलिसांनी चालकाची मोटारगाडी अडवली. चालकाचे नाव विशाल घोरपडे (वय ३४) असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला पार्कसाईट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीने जाणूनबुजून भरधाव वेगाने मोटारगाडी चालवून उपनिरीक्षक खवळे यांच्या अंगावर घातली. त्यामुळे त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न करणे व सरकारी अधिकाऱ्याला जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पार्कसाईट पोलीस अधिक तपास करत आहेत.