मुंबई : नाकाबंदीत तैनात पोलीस अधिकाऱ्याला मोटरगाडीने धडक दिल्याची घटना गुरूवारी गोरेगाव पूर्व येथे घडली. आरोपी विरुद्ध दिशेने मोटरगाडी घेऊन येत होता. त्याला रोखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने हात केला असता त्याने मोटरगाडी न थांबवता पोलीस अधिकाऱ्याला धडक दिली. या घटनेत पोलीस निरीक्षकाच्या डोक्याला व पाठीला मार लागला असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. याप्रकरणी अज्ञात मोटरगाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दिंडोशी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

तक्रारदार संतोष मोरेश्वर संख्ये (५७) हे दिंडोशी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. ते बुधवारी रात्रपाळीसाठी कामावर होते. त्यावेळी त्यांना गोरेगाव पूर्व येथील लकी हॉटेलसमोरील पुलावर नाकाबंदीसाठी तैनात करण्यात आले होते. गुरूवारी पहाटे एक मोटरगाडी विरुद्ध दिशेने येत असल्याचे संख्ये यांच्या निदर्शनास आले. त्यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. पण चालकाने मोटरगाडीचा वेग कमी केला नाही. त्यावेळी या मोटरगाडीने संख्ये यांना धडक दिली. तेव्हा ते खाली कोसळले. त्यांना इतर पोलिसांनी जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटर येथे उपचारासाठी नेले. अपघातात संख्ये यांच्या नाकाला, कपाळाला, डोक्यावर व पाठीला दुखापत झाली. ट्रॉमा केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची स्थिती स्थीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनास्थळी सीसी टीव्ही नाही

संख्ये नाकाबंदीला तैनात असताना पांढऱ्या रंगाची मोटरगाडी विरुद्ध दिशेने येत होती. त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने मोटरगाडी न थांबवता संख्ये यांना धडक दिली. त्यानंतर चालकाने तेथून पळ काढला. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३२, २२१, १२५, १२५(अ), २८१ व मोटर वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत निष्काजीपणे मोटरगाडी चालवून संख्येंना जखमी केल्याप्रकरणी अज्ञात मोटरगाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून तेथे कोणताही सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस या रस्त्याला जोडणाऱ्या इतर रस्त्यांवरील सीसीटीव्ही चित्रिकरणाची तपासणी करत आहेत. जखमी पोलीस उपनिरीक्षक संख्ये यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाची मोटरगाडी होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. पहाटे दोन ते तीनच्या सुमारास हा अपघात घडल्यामुळे रस्त्यावरही अधिक रहदारी नव्हती. त्यामुळे संख्ये यांना धडक देणाऱ्या मोटरगाडीला पाहणारा प्रवासी मिळणेही कठीण असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी दिंडोशी पोलीस अधिक तपास करत आहेत.