मुंबई : जगातील सर्वाधिक व्यस्त लोकल सेवांमध्ये मुंबई उपनगरीय लोकलचा समावेश आहे. या मार्गावर मिनिटांगणीक एक लोकल फेरी होत असते. रेल्वेच्या गुंतागुंतीच्या जाळ्यांमुळे काही वेळा मानवी चूका रेल्वे अपघाताला कारणीभूत ठरतात. परिणामी, प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येते. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी मध्य रेल्वेने लोकलच्या मोटरमन डब्यात ‘ऑडिओ अलर्ट युनिट्स’ यंत्रणा बसविली आहे. मोटरमनच्या डब्यात बसवण्यात आलेल्या या यंत्रणेमुळे लोकलच्या कामकाजादरम्यान धोक्याची आगाऊ सूचना मिळू शकणार आहे. परिणामी अपघात टळण्यास मदत होऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> व्यवसाय परवाना वितरणातील पारदर्शकतेसाठी मुंबई महानगरपालिकेचे एक पाऊल पुढे, नऊ सदस्यीय समिती स्थापन
लोकलमधील मोटरमनच्या डब्यात ‘ऑडिओ अलर्ट युनिट्स’ बसविण्यात येत आहे. पुढील रेल्वेला लाल सिग्नल असल्याचे कळताच मोटरमनला लोकल थांबवता येईल. सध्या मुंबई विभागातील एकूण १५१ लोकलपैकी ९० लोकलमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. उर्वरित ६१ लोकलमध्ये मार्च २०२४ पर्यंत ‘ऑडिओ अलर्ट युनिट्स’ बसविण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> वैद्यकीय व्यवसाय स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांनी सेवाभावी वृत्तीने काम करावे- ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांचा सल्ला
मोटरमनने ‘पिवळा’ सिग्नल ओलांडल्यानंतर ‘पुढील सिग्नल लाल आहे, सावध रहा.’ असा ऑडिओ अलर्ट मोटरमनला दिला जातो. सतर्कतेबाबत पूर्वसूचना देणाऱ्या या ऑडिओ प्रणालीमुळे रेल्वे मार्गावरील अपघात टाळण्यास मदत होईल. तसेच प्रवाशांची सुरक्षितता मजबूत करेल, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एका लोकलमध्ये ‘ऑडिओ अलर्ट युनिट्स’ यंत्रणा बसवण्यासाठी सुमारे १८ हजार रुपये खर्च येतो. आतापर्यंत या यंत्रणेसाठी १६ लाख २० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.