अलिबाग: मुंबई गोवा महामार्गावर महाड जवळ नांगलवाडी इथे शनिवारी सायंकाळी दरड कोसळली. त्यामुळे मुंबईकडून गोव्याला जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. महाड परीसरात दुपारपासून पावसाची संततधार सुरू होती. पहिल्याच पावसात नांगलवाडी येथे महामार्गावर ही दरड कोसळली. सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही. पोलिसांनी स्थानिक यंत्रणांच्या मदतीने दरड हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. दरड कोसळतानांची दृश्य प्रवाश्यांच्या फोन मध्ये कैद झाली आहेत.

कोकणात सतत दरडी का कोसळतात, दरडी कोसळण्या मागील नैसर्गिक कारणे

कोकणात दरडी कोसळण्याची प्रामुख्याने चार कारणे आहेत. येथील प्रदेश हा प्रामुख्याने पर्वतमय आहे. या ठिकाणी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. खडकांची रचना दरडीं कोसळण्यास कारणीभूत ठरते. या शिवाय हा परिसर भूकंप प्रवण क्षेत्रात मोडतो त्यामुळे दरडीचा धोका जास्त संभावतो. कोकणातील बहुतांश रस्ते हे घाट माथ्यावरून जातात. या रस्त्यांसाठी ठिकठिकाणी डोंगर पोखरले जातात. कालांतराने या परीसरात सैल झालेले डोंगर, दगड गोटे कोसळण्यास सुरवात होते. त्यामुळे कोकणात रस्ते रेल्वे मार्गात दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक असते.

हेही वाचा : “मुख्यमंत्र्यांनी मला मंत्रीपदाबाबत विचारलं, तर…”; श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका!

दरडी कोसळण्यामागील मानवनिर्मित कारणे

कोकणातील वाड्या वस्त्या या डोंगर माथ्यावर, डोंगर कुशीत अथवा डोंगरांच्या पायथ्याशी वसलेल्या असतात. या वस्त्यांचा विस्तार जेव्हा होतो, काही प्रमाणात उत्खनन अथवा सपाटीकरण केले जात असते. हे घटक त्यामुळे कालांतराने दरडी कोसळण्यासाठी कारणीभूत ठरतात. चर खणणे, वणवे लावणे, डोंगर माथ्यावरील वृक्षतोड करणे हे घटकही दरडी कोसळण्यासाठी सहाय्यभूत ठरतात.

हेही वाचा : आमदार प्रकाश सोळंकेंचा मोठा दावा; म्हणाले, “रोहित पवार स्वत: भाजपामध्ये…”

कमी वेळात जास्त पाऊस ठरतो धोकादायक

ज्या वेळेस कमी वेळात जास्त पाऊस पडतो त्यावेळेस दरडी कोसळतात. १८ आणि १९ जुलैला कर्जत आणि खालापूर परिसरात ३०० ते ३५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर माथेरान लगतच्या परिसरात ५०० मिलीमीटरहून अधिक पाऊस कोसळला, त्यामुळे इर्शाळवाडी परिसरात दरड कोसळली. तळीये येथेही दोन दिवसात ५०० ते ७०० मिलीमीटर पाऊस पडला होता. यानंतर दरड कोसळली होती. जुलै २००५ लाही महाड पोलादपूर परिसरात दोन दिवसात ६०० ते ८०० मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे जुई, दासगाव, रोहण, कोंडीवते गावांवर दरडी कोसळल्या होत्या.