पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या राज्य सरकारने डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
सह्याद्री पर्वत रांगांच्या छायेतील कोकण, पुणे आणि नाशिक विभागात डोंगरांच्या पायथ्याशी मोठय़ा प्रमाणात विशेषत: आदिवासींच्या वस्ती आहेत. पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर कोणत्या डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या गाव-पाडय़ांना दरडी कोसळण्याचा धोका आहे याचे सर्वेक्षण आधीच जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणच्या रहिवाशांना त्वरित सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिले आहेत.
मदत पथक आणि दुर्घटना
एखादी दुर्घटना घडल्यास केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलास (एन.डी.आर.एफ.) पाचारण करावे लागते. प्रत्येक राज्य सरकारकडे अशी व्यवस्था असावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली होती. यानुसार राज्यात अशी यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि नेमकी त्याच दिवशी भीमाशंकरजवळ दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली.
राज्य आपत्ती प्रतिसाद दल (स्टेट डिसास्टर रिसपॉन्स फोर्स) स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. केंद्र सरकारच्या सूचनेवरून राज्यात हे पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिली. हे पथक स्थापन करण्याचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर दाखविण्यात आला होता. हे पथक स्थापन करण्याचा निर्णय झाला तेव्हाच भीमाशंकर जवळ दरड कोसळून १०० ते १५० जण अडकल्याची सविस्तर माहिती हाती आली होती. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन तुकडय़ा स्थापन करण्यात येणार असून, प्रत्येक पथकात ४५ कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. तीन पथकांमध्ये एकूण ४२८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली. प्रत्येक पथकाचे नेतृत्व सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असेल तसेच पोलीस दलातून प्रतिनियुक्तीवर या पथकांमध्ये जवान तैनात केले जातील.
*का कोसळतात दरडी?
डोंगरी शेत केलं.. वाऱ्या-पाण्याने नेलं
दरडी कोसळण्याच्या घटना महाराष्ट्राला नव्या नाहीत. विशेषत: आपल्या काळ्या खडकात (बेसॉल्ट) अशा घटना पूर्वीही घडल्या आहेत. विशेषत: कोकण आणि सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यांवर त्या वेळोवेळी घडल्या आहेत. अलीकडची मोठी घटना म्हणजे- जुलै २००५ साली रायगड जिल्ह्य़ातील रोहन, दासगाव, आदी चार गावांमध्ये अशा दरडी कोसळून अनेक घरे दबली गेली होती. त्यातही आजच्या सारखेच दगड, चिखल वाहून आले होते.
नैसर्गिक कारणे
*बेसॉल्ट खडक कठीण असला तरी त्याला मूलत: काही भेगा असतात. त्या आडव्या असतात, तशाच उभ्यासुद्धा असतात. उभ्या भेगांमुळे काही कडे मूळ डोंगरापासून सुटे होतात. सह्य़ाद्रीत असे अनेक कडे पाहायला मिळतात. पाऊस, वारा व ऊन यांच्यामुळे शेकडो वर्षांपासून त्यांची झीज होऊन कालांतराने हे कडे कोसळतात. याशिवाय डोंगरउतारावर सुटी झालेली मातीसुद्धा पावसात अशाच प्रकारे खाली सरकते. महाबळेश्वरजवळ अशा घटना घडलेल्या पाहायला मिळतात.
*याशिवाय भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळेसुद्धा दगडी कोसळतात. याशिवाय भूगर्भातील इतर हालचालींचा परिणाम म्हणूनही दरडी कोसळू शकतात.
मानवनिर्मित कारणे
*माणसाच्या विविध उद्योगांमुळेही दरडी कोसळतात. त्यात प्रामुख्याने रस्त्याची कामे किंवा इतर बांधकामे करताना डोंगर पोखरणे व तो अस्थिर करणे हे प्रमुख कारण आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग किंवा कोकणात उतरणाऱ्या अनेक घाटांमध्ये दरडी कोसळण्याला ही बाब कारणीभूत आहे.
*डोंगरउतार किंवा पठारावरील सुटय़ा झालेल्या मातीला धरून ठेवण्याचे काम झाडे करतात. अनेक ठिकाणी झाडांची बेसुमार तोड झाल्यामुळे ही माती सुटी होऊन तिची धूप होते. ही सुटी झालेली माती पावसासोबत खाली वाहून दुर्घटना होऊ शकतात.
डोंगर पायथ्याशी राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवा
पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या राज्य सरकारने डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

First published on: 31-07-2014 at 04:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Move people at secure place liveing at hill side