पेशवाईत दस्तुरखुद्द पेशव्यांनाच गुंडाळून कारभार करण्यामुळे सखारामबापू बोकील प्रसिद्धीच्या झोतात आले. अशीच काहीशी परिस्थिती सध्या पुण्यातील मनसेमध्ये निर्माण झाली असून येथील ‘सखारामबापू’मुळे एलबीटीप्रकरणी दुकाने बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात राज यांच्या स्पष्ट इशाऱ्यानंतरही आंदोलन करायचे तरी कसे, असा प्रश्न मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.
‘तुम्ही सरकारशी भांडा, मात्र दुकाने बंद ठेवून लोकांना त्रास देऊ नका, अन्यथा मनसेला योग्य ती कारवाई करावी लागेल,’ असा इशारा आतापर्यंत तीन वेळा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज यांनी इशारा देताच आंदोलन करण्याची सवय असलेल्या पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दुकानदारांना मनसे स्टाईलने समज देण्यास सुरुवातही केली. ठाणे व मुंबईतही मनसेने आंदोलन सुरू केले. पुण्यातही मनसेने आंदोलन सुरू केल्याचे समजताच व्यापाऱ्यांनीही दुकाने उघडण्यास सुरुवात केली खरी. मात्र त्याच वेळी मनसेचे सरचिटणीस व पुण्याचे प्रभारी अनिल शिदोरे यांनी शहर अध्यक्ष बाळा शेडगे यांना एसएमएस करून एलबीटीसंदर्भात साहेबांच्या आदेशाची वाट पाहात असून तोपर्यंत कोणीही आंदोलन करू नये असा फतवा काढला. एवढेच नव्हे तर मला विचारल्याशिवाय कोणीही पक्षाची अधिकृत भूमिका माध्यमांकडे देऊ नये असा फतवाच जारी केला आहे. राज ठाकरे यांचे आदेश मानायचे की शिदोरे यांचे, असा प्रश्न मनसेमध्ये निर्माण झाला आहे. प्रामुख्याने नाशिक व पुण्यात राज यांच्या एका आदेशावर मनसेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी अनेक आंदोलने केली.
या आंदोलनात डझनावारी केसेस घेतलेल्या मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष प्रशांत कनोजीया यांना एका झटक्यात काढून अवघ्या तीन महिन्यापूर्वी उपविभाग अध्यक्ष असलेल्याला शिदोरे यांनी शहर अध्यक्ष केले. एवढेच नव्हे तर बंडू ढेरे शहर अध्यक्ष असताना बाळा शेडगे यांची दुसरा शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करून मनसेत गटतट निर्माण केल्याचा आक्षेप येथील कार्यकर्त्यांचा आहे. पुणे महापालिकेत चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या रवी धनगेकर यांना डावलून विरोधी पक्षनेता व गटनेतेपदी वसंत मोरे यांची नियुक्ती केली.
शिदोरे यांचे स्पष्टीकरण
याबाबत शिदोरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘राज ठाकरे यांच्याशी मी स्वत: बोललो होतो. मात्र, त्यांच्याकडून पुण्यातील बंदबाबत अजून काही करण्याचे स्पष्ट आदेश आलेले नाहीत.’