परिचारिकाही आंदोलनाच्या पवित्र्यात; पाच महिन्यांपासून पगार थकल्याचा प्रश्न
पुणे येथील सिंहगड संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अध्यापक-कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनाचा प्रश्न असतानाच आता संस्थेच्या ‘काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालया’तील वैद्यकीय प्राध्यापक, परिचारिका तसेच चतुर्थश्रेमी कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून म्हणजे गेले पाच महिने पगारच देण्यात आलेला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पाच पाच महिने पगार नसल्याने हवालदिल झालेल्या डॉक्टरांनी गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन पुकारले असून परिचारिकाही आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.
काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय हे २००७ पासून सुरु असून महाविद्यालयात एमबीबीएसची १५० विद्यार्थी क्षमता आहे तर ४४ पदव्युत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयात नऊशे खाटा असून सुमारे ५०० अध्यापक (निवासी डॉक्टरांसह), ६३१ परिचारिका व अन्य कर्मचारी मिळून एकूण २४०० कर्मचारी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेले पाच महिने या सर्वानाच पगार मिळत नसल्यामुळे सर्वप्रथम कर्मचाऱ्यांनी अधिष्ठात्यांकडे वेतनाबाबत विचारणा केली. त्यातून कोणताही समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे हतबल झालेल्या झालेल्या कर्मचाऱ्यांचा आक्रोश संस्थाचालक प्राध्यापक मारुती नवले यानी ऐकून तरी घ्यावा यासाठी त्यांच्या भेटीची मागणी कर्मचारी करत आहेत. याच दरम्यान परिचारिकांनीही पगारासाठी आग्रह धरला असून अस्वस्थ वैद्यकीय अध्यपकांनी गेल्या दोन दिवसांपासून अधिष्ठात्यांच्या कार्यालयाहेर आंदोलन सुरु केले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संस्थेला वार्षिक सुमारे ४४ कोटी रुपयांचे उत्पन्न आहे तर वेतनावर दरमहा पावणेसहा कोटी रुपये म्हणजे वर्षिक ६८ कोटी रुपयांची गरज आहे. संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या ९०० खाटांच्या रुग्णालयात रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नसल्यामुळे संस्थेचा आर्थिक बोजा वाढत चालला आहे. त्यातच काही शैक्षिण संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांच्या नावे बँकेतून कर्ज उचलण्यात आली असून त्याचे हप्ते न भरल्यामुळे कर्मचाऱ्यांना बँकेने नोटिसा बजाविल्यामुळेही कर्मचारी कमालीचे अस्वस्थ बनले आहेत.

थकबाकी येताच पगार देऊ – नवले
शासनाकडून फी पोटीचे १३ कोटी रुपये येणे आहे तसेच काही विद्यार्थ्यांकडून फीचे ५० लाख रुपये येणे आहे. ते आल्यानंतर पगार केले जातील. तसेच काही लोकांचे वेतन केले असून लवकरच सर्वाचे पगार दिले जातील, असे संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. तथापि पाच पाच महिने वेतन न मिळालेले कर्मचारी केवळ आश्वासनावर घर कसे चालवणा हा खरा कळीचा प्रश्न असून सर्वकाही सरकारवर ढकलून मोकळे होता येणार नाही, असे अध्यापकांचे म्हणणे आहे.

Story img Loader