लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: शिवसेना आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्याच्या घटनेला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. आमदारांच्या बंडखोरीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. काही ठिकाणी पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकडही केली. मात्र माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात एक माजी केंद्रीय मंत्री, तीन आमदार आणि माजी महापौर असतानाही शुकशुकाट होता. या प्रकाराचे तीव्र पडसाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये उमटले असून वरळी परिसरातील पदाधिकाऱ्यांना तातडीने बुधवारी दुपारी सेना भवनात बोलावण्यात आल्याचे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदारांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतरच्या काळात राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून राज्यात सरकार स्थापन केले. शिवसेनेत झालेल्या बंडाच्या घटनेला मंगळवारी एक वर्ष झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील संवेदनशील भागात सोमवारी रात्रीपासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखांबाहेर मंगळवारी सकाळपासूनच तणावाचे वातावरण होते. शिवसैनिकांच्या आंदोलनामुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तैनात होते.

आणखी वाचा-“…तर एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती”; केसरकरांच्या गौप्यस्फोटावर संजय राऊत म्हणाले, “बापरे…”

काही ठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसैनिकांची धरपकडही करण्यात आली. शिवसेना दक्षिण मुंबई मध्यवर्ती शाखेमध्ये शिवसैनिकांसोबत बैठकीत व्यस्त असलेले विभाग प्रमुख संतोष शिंदे आणि माजी नगरसेवक अरविंद दुधवडकर यांच्यासह काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होती. त्याच वेळी आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात मात्र शुकशुकाट दिसत होता. शिवसेना शाखांबाहेर आंदोलनाबाबत फारशी उत्सुकता नव्हती. दुपारचे ४ वाजले तरीही वरळी परिसरात आंदोलनाचा मागमूस नव्हता. ही बाब पक्षातील वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच स्थानिक नेत्यांची कानउघाडणी करण्यात आली. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरळी नाक्यावरील शिवसेना शाखेत धाव घेतली. शिवसैनिकही जमा झाले. मात्र वरळी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे पदाधिकारी द्विधा मनस्थितीत होते. अखेर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधून स्थानिक नेत्यांनी मनोमनी निषेध नोंदवला.

आणखी वाचा-बंडखोरीच्या निषेधात वरळी शांतच, आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात तीन आमदार असूनही शुकशुकाट

वरळी परिसरात विविध कामांसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. आंदोलनामुळे वाहतूक कोंडीत भर पडून नागरिकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलन करण्यात आले नसले, तरी आमच्या मनात बंडखोर आमदारांबद्दल प्रचंड राग आहे. त्यांचा आम्ही निषेध करतो, असे विधान परिषदेवरील आमदार सुनील शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले.

वरळी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांमधील उदासिनतेची ‘मातोश्री’ने गंभीर दखल घेतली आहे. वरळी परिसरातील पदाधिकाऱ्यांना तातडीने बुधवारी दुपारी सेना भवनात उपस्थित राहण्याचे फर्मान पाठविण्यात आले आहे. त्यामुळे हे पदाधिकारी कमालीचे धास्तावले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movement of leaders of mahavikas aghadi to protest rebellion of mlas urgent meeting at sena bhavan mumbai print news mrj
Show comments