लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई / ठाणे / नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरून महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी मुंबईत रविवारी महाविकास आघाडीने (मविआ) ‘जोडे मारा’ आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर टीकेचा भडिमार केला. या आंदोलनावरून ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआला लक्ष्य केले.

मविआच्या आंदोलनाला हुतात्मा चौकात सुरुवात झाली. चौकात फलकबाजीला बंदी असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एक फलक लावला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर प्रकरण निवळले. सकाळी साडेअकराच्या सुमारास हुतात्मा चौकातून मोर्चा गेट वे ऑफ इंडियाकडे निघाला. मोर्चाला परवानगी नसली तरी पोलिसांनी मज्जाव केला नाही. गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतल्यानंतर मविआ नेत्यांनी ‘जोडे मारा’ आंदोलन केले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत विरोधकांनी ‘महायुती सरकार चले जाव’ असा नारा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे आजही दिमाखात उभे आहेत. मात्र राजकोट किल्लावरील पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाल्याने तो पडला, अशा शब्दांत शरद पवार यांनी सरकारवर टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली नसती तर, महाराष्ट्राने त्यांना ‘शिल्लक’ ठेवले नसते. या महाराष्ट्रद्रोही सरकारला आता बाहेरचा रस्ता दाखवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. तर शिवद्रोही सरकार राज्यात पुन्हा येऊ देणार नाही, अशी महाराष्ट्रातील जनतेने शपथ घेतल्याचा दावा नाना पटोले यांनी केला. या आंदोलनात खा. छत्रपती शाहू महाराज, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह मविआचे अनेक नेते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज प्रकृती बरी नसतानाही या आंदोलनासाठी आल्याचा उल्लेख पटोले यांनी आपल्या भाषणात केला.

हेही वाचा >>>कारण राजकारण: कालिदास कोळंबकर यांना यंदाची निवडणूक कठीण?

मविआच्या या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांनी सडकून टीका केली. ‘‘मालवणची घटना दुर्दैवी आहे. परंतु त्यावर राजकारण करणे हे अधिक दुर्दैवी आहे. घरी बसलेले आता रस्त्यावर उतरत आहेत,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात उद्धव ठाकरे यांना नाव न लक्ष्य केले. जनताच त्यांना त्यांना कायमचे घरी बसवेल, असा दावाही शिंदे यांनी केला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदार संघातील विविध वास्तूंचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनीही ‘जोडे मारा’ आंदोलन संपूर्ण राजकीय असल्याचा आरोप केला. ‘‘इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले आहे, असे एक भाषण मविआच्या नेत्यांनी दाखवावे. पंडित नेहरू यांनी ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’मध्ये शिवाजी महाराजांबाबत जे लिहिले होते त्याबद्दल ‘मविआ’ माफी मागणार का?’’ असा सवाल त्यांनी केला.

शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना होऊ शकते?’

‘‘पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितल्याचे भाजपकडून सांगितले जाते. त्यांनी माफी मागितली आणि लगेच सावरकरांवर टिप्पणी केली. विषय काय आणि पंतप्रधान बोलतात काय? आता शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते का?’’, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ज्यांनी रयतेचे राज्य आणले त्यांची तुलना सावरकरांबरोबर पंतप्रधान करतात. याचा अर्थ पंतप्रधान चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या विचारांना प्रोत्साहित करतात, असा आरोप पवार यांनी आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

करोनामध्ये, महापुरामध्ये यांनी मदत केली असती तर नागरिकांनी त्याची आठवण ठेवली असती. आता सर्व राजकारण आहे. पण जनता सुज्ञ आहे. निवडणुकीत ते यांना कायमचे घरी बसवतील. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

पंतप्रधानांनी माफी मागतानाही त्यांच्यात एक मग्रुरी होती. पंतप्रधान माफी मागत असताना ‘एक फूल दोन हाफ’पैकी एक हाफ हसत होता. हे लाजिरवाणे आहे. या चुकीला माफी नाही. – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उबाठा)