महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा निषेध नोंदवला असून, मुंबई पोलिसांनी अरविंद सावंत यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी देखील केली आहे. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोलिसांचा अपमान सहन करणार नाही. असं देखील खोपकर यांनी म्हटले आहे.
“शून्य कामगिरी परंतु कार्यकर्त्यांसमोर चमकोगिरी करणाऱ्या खासदार अरविंद सावंत यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. सणासुदीच्या या काळात कुठेही गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून सतत दक्ष असणारे आपले मुंबईचे पोलीस. बाप्पाचं सण निर्वघ्नपणे पार पडवा यासाठी पावसा-पाण्यात, उन्हात राबणारे पोलीस जेव्हा आता दमलेले आहेत, तेव्हा तुम्ही घाणेरडं राजकारण करत आहात?, अहोरात्र मेहनत करणारे २४ तास पोलीस घरी देखील गेलेले नाहीत आणि तुम्ही त्यांच्याशी तावातावाने बोलताय. हातवारे करतात, त्यांना बोट दाखवतात तुम्हाला पोलिसांची भीती राहिलेली नाही का? पोलिसांचा अपमान करणाऱ्या अशा खासदाराचा मी निषेध करतो. अरविंद सावंत यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी.” असं खोपकर म्हणाले आहेत.
याचबरोबर, “पोलिसांचा असा अपमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच सहन करणार नाही. कार्यकर्त्यांच्या समोर चमकोगिरी करण्यासाठी तुम्ही पोलिसांच्या अंगावर जाताय. अरविंद सावंत आणि नवनीत राणा यांच्या सारख्यांना आम्ही नेता मानतच नाही. हे नेते होऊच शकत नाही, यापुढे पोलिसांवर आवाज चढून बोलणारे, हातवारे करून बोलणारे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. ही मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करतो.” अशी देखील मागणी खोपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत चर्चा सुरू आहे ती शिवसेना आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याची. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण शांत झालं. मात्र, दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदेंनी केला. त्यामुळे सरवणकर विरुद्ध शिंदे असा हा सामना सुरू असतानाच पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल केल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले. या पार्श्वभूमीवर आज पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “ठाकरे सरकारनं गुंडांचा बंदोबस्त केला. त्यांच्या कारकिर्दीत एकही दंगा घडला नाही. कुणाची हिंमत झाली नाही. आता राज्यकर्तेच बोलत आहेत. एक म्हणतो चुन चुन के मारेंगे, दुसरा म्हणतो तंगड्या तोडीन, तिसरा आमदार गोळीबार करतो. चौथी महिला खासदार पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांशीच गैरवर्तन करते. पण गुन्हा दाखल होत नाही”.
“..तर मग खरी शिवसेना काय आहे हे कळेल” –
“कारवाई होत नाही, गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. शिवसेना कार्यकर्त्यांवर खोटा ३९५ गुन्हा दाखल केला, तो काढून घेण्याची मागणीही आम्ही केली. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मग खरी शिवसेना काय आहे हे ज्यांना कुणाला पाहायचंय, त्यांना ते कळेल”, असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला आहे.