प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं अखेर बारा दिवसांनी त्यांना जामीन मंजूर केला. आज सकाळी भायखळा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट लीलावती रुग्णालयात उपचारासाठी गेल्या आहेत. नवनीत राणा यांच्या सुटकेनंतर तब्बल ५ ते ६ तासांनी रवी राणा यांची तळोजा तुरुंगातून सुटका झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तळोजा तुरुंगातून सुटका होताच रवी राणा आपल्या पत्नीच्या भेटीला लीलावती रुग्णालयात पोहोचले आहेत. यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या देखील त्यांच्यासोबत होते. मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर रवी राणा यांना तळोजा तुरुंगात तर नवनीत राणा यांना भायखळा येथील महिला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तेव्हा पासून राणा दाम्पत्याची भेट झाली नव्हती. कोर्टात सुनावणीच्या वेळी काही क्षण दोघांची भेट झाली होती.

नवनीत राणा यांना मणक्यासंबंधित त्रास असल्याने त्या वारंवार रुग्णालयात जाण्यासाठी तुरूंग प्रशासनाकडे विनंती करत होत्या. त्यानंतर काल भायखळा तुरुंग प्रशासनाने त्यांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. पण त्यानंतर रात्री त्यांना पुन्हा भायखळा तुरुंगात नेलं होतं. जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी तुरुंगातून सुटका होताच, नवनीत राणा लीलावती रुग्णालयात उपचारासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांना याठिकाणी दाखल करून घेण्यात आलं. नवनीत राणा यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पती रवी राणा यांची भेट झाल्यानंतर नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले होते.

राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. संबंधित विषयावरून माध्यमांशी संवाद साधू नये, अशी अट न्यायालयाकडून घालण्यात आली आहे. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रवी राणा माध्यमांशी काहीही बोलले नाहीत. यावेळी रवी राणा यांच्या हातात हनुमान चालीसाचं छोटं पुस्तक होतं.

नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खाजगी निवासस्थान मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा म्हणणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं होतं. त्यामुळे शिवसैनिक आणि राणा दाम्पत्यांच्या यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. शेकडो कार्यकर्ते मातोश्रीबाहेर पहारा देत होते.

यावेळी राणा दाम्पत्यांनी प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती. मागील बारा दिवसांपासून राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत होतं. त्यांच्या विरोधात पोलिसांनी भादंवि कलम १२४ अ नुसार राजद्रोह, राज्य सरकारविरोधात प्रक्षोभक विधाने करणे आणि सरकारला आव्हान देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. अखेर बारा दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर आलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp navneet rana and mla ravi rana meet after 12 days hanuman chalisa row viral video rmm