मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणीचा प्राचीन आणि समृद्ध वारसा जपण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी नुकतीच केली. त्यासाठी येथील मुळ लेण्यांचे संवर्धन करून या परिसरात पर्यटकांसाठी माहिती केंद्र, ध्यानधारणा केंद्र, तसेच प्रदर्शन सभागृह उभारण्याच्या सूचना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तसेच पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेण्यांची पीयूष गोयल यांनी शुक्रवारी पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रवीण दरेकर होते. पहिल्या शतकापासून नवव्या शतकापर्यंत उत्खनन करण्यात आलेल्या कान्हेरीची माहिती जगभर पसरून त्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ झाली पाहिजे, अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली. तसेच संजय गांधी उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना या लेण्यांची माहिती व्हावी यासाठी या लेण्यांची प्रतिकृती उद्यानात तयार करावी. त्यासाठी राजस्थान अथवा गुजरातमध्ये पाषाण उपलब्ध होतात का याचा शोध घ्यावा, असे पीयूष गोयल यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सुचवले.
लेण्यांचे अभ्यासक, ध्यानधारणा करण्यासाठी येणारे भाविक यांना या स्थळाची इत्यंभूत माहिती मिळावी यासाठी माहिती केंद्र असले पाहिजे. तिथे पुरेशा सोयी-सुविधा असल्या पाहिजेत. त्याचबरोबर पिण्यासाठी पाणी, उत्तम दर्जाची खानपान सेवाही पुरवली पाहिजे. त्यामुळे येथे देश आणि विदेशातून येणाऱ्या पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भर पडेल, असेही ते म्हणाले. या परिसरात स्वच्छता ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मिनी ट्रेन जुलैलामध्ये सुरू होणार
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटकांचे आकर्षण असलेली वनराणी ही मिनी ट्रेन सध्या डागडुजीसाठी बंद आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो. मात्र आता ही ट्रेन इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्यात येत असून जुलै महिन्यात या मिनी ट्रेनचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहितीही गोयल यांनी यावेळी दिली.