लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुंबई शहर तसेच इतर ठिकाणी भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. भटक्या खुत्र्यांच्या टोळ्या लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करतात आणि काही वेळा या हल्ल्यातून मृत्यू झाल्याचे देखील समोर आले आहे. ही बाब लक्षात घेऊन भटक्या कुत्र्यांसाठी निवारागृह बांधावे, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून केली आहे.

मुंबई शहरात वर्षाला सुमारे ६५ हजार श्वान हल्ल्यांच्या घटनांची नोंद होते. ही बाब अत्यंत धोकादायक आहे. काही दिवसांपूर्वीच एका आघाडीच्या चहा कंपनीच्या मालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता, आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईत भटक्या कुत्र्यांनी पोस्टमनवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस ऐरणीवर येत आहे. नागरिकांचा विचार करता ही समस्या सोडवणे अत्यंत आवश्यक आहे.

आणखी वाचा-मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : युवासेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटामधील सामना रंगणार

भटक्या कुत्र्यांची योग्य काळजी घेतली जात नाही, तसेच पोषण किंवा वैद्यकीय उपचार मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना विविध आजार होतात. यापैकी काही श्वान आजारांना बळी पडतात. म्हणूनच या भटक्या श्वानांसाठी एक निवारागृह उभारले जावे, अशी मागणी शेवाळे यांनी चहल यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. त्यामुळे या प्राण्यांना एक सुरक्षित आणि मानवीय वातावरण मिळू शकेल, त्यांची आवश्यक काळजी घेता येईल, वैद्यकीय उपचार करता येतील आणि त्यांचे चांगले पोषण होऊ शकेल. यामुळे भटक्या कुत्र्यांचा त्रास आणि हल्ल्याच्या घटना कमी होतील, असे शेवाळे यांचे म्हणणे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp rahul shewale demands to set up a shelter for stray dogs mumbai print news mrj