मुंबई : समाजमाध्यमावरून आपल्याविरोधात बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या दुबईस्थित तरुणीला मज्जाव करावा, या मागणीसाठी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. समाजमाध्यमावरून आपल्याविरोधात बदनामीकारक मजकूर पसरवल्याबद्दल या तरुणीवर कारवाई करण्याचे आदेश सरकारला देण्याची मागणीही शेवाळे यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नाच्या बहाण्याने शेवाळे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप दुबईस्थित ३३ वर्षीय तरुणीने केला होती. तसेच, शेवाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या तरुणीने समाजमाध्यमावरून याबाबतचा मजकूर प्रसिद्ध केला होता. तसेच, ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत तक्रार केली होती.

हेही वाचा – मुलुंड, ठाण्यातील काही भागात शुक्रवारपासून दुषित पाणीपुरवठा; जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे जाणाऱ्या जलबोगद्याला हानी

शेवाळे यांनी याचिकेत हे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये एका जवळच्या मित्राच्या माध्यामातून आपली या तरुणीशी भेट झाली होती आणि आपण तिला आर्थिक मदत केली होती. परंतु, तिने पैशांसाठी आपल्याला त्रास देण्यास सुरू केल्याचा दावा शेवाळे यांनी याचिकेत केला आहे. या तरुणीने आपल्याला ५६ लाख रुपयांना फसवले. शिवाय जास्त पैसे देण्यास नकार दिल्यावर तिने आपल्याला धमकावण्यास सुरुवात केली. आता ही तरुणी आपल्यावर बलात्काराचे आरोप करत असून, समाजमाध्यमावरून आपली बदनामीही करत आहे, असा दावाही शेवाळे यांनी केला.

हेही वाचा – नारायण राणे सभा गोंधळ प्रकरण : शिवसेना, मनसेच्या नेत्यांसह ३८ जणांना न्यायालयात उपस्थित राहाण्याचे आदेश, शेवटची संधी

लोकांच्या मनात आपल्याबाबत अविश्वास निर्माण करण्यासाठी ही तरुणी समाजमाध्यमावरून आपली बदनामी करत आहे. ती कोणाच्या तरी सांगण्यावरून जनमानसातील आपली प्रतिमा मलीन करत आहे. तसेच, समाजमाध्यमांवरील आपले अनुयायी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असाही दावा शेवाळे यांनी केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp rahul shewale moves to high court against a young woman for defamatory statements ssb