गेले काही दिवस रेल्वे प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत असताना लोकप्रतिनिधींना त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. रेल्वेच्या प्रश्नावरच चर्चा करण्यासाठी नुकत्याच झालेल्या एका बैठकीला मुंबई व ठाण्यातील खासदारांनी दांडी मारली. या बैठकीला फक्त एकनाथ गायकवाड, हुसेन दलवाई व इश्वरलाल जैन हे तीनच खासदार उपस्थित होते, अशी माहिती पुढे आली आहे.
मुंबईपासून खोपोली आणि विरापर्यंतच्या प्रवाशांसाठी रेल्वे म्हणजे त्यांची जीवन रेखा मानली जाते. दररोज सुमारे ६० ते ६५ लाख प्रवाशी लोकलमधून प्रवास करतात. परंतु हा प्रवास त्यांना कधीच सुखाचा ठरत नाही. गेले पाच-सहा दिवस मध्य रेल्वेची लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. परंतु या प्रश्नावर मुंबई व ठाणे जिल्ह्य़ातील खासदार मुग गिळून गप्प बसले आहेत. त्याबद्दल प्रवाशांमधूनच संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीने साधरणत: तीन महिन्यांतून एकदा रेल्वेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तसेच सूचना मागविण्यासाठी बैठक घेतली जाते. या बैठकांना खासदारांना बोलाविले जाते. अशाच प्रकारे मुंबईत मध्य रेल्वे प्रशासनाने २९ डिसेंबरला बैठक बोलाविली होती. या बैठकीला लोकसभेचे खासदार एकनाथ गायकवाड, राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई व जळगावचे इश्वरलाल जैन उपस्थित होते. मुंबईतील इतर पाच व ठाण्यातील दोन खासदारांनी या बैठकीला दांडी मारली. या बैठकीत प्रामुख्याने गायकवाड यांनी पंधरा डब्यांच्या गाडय़ांसाठी फलाटांची लांबी वाढविवावी, कुर्ला, शीव-कोळीवाडा, मानखुर्द येथे नवीन पूल बांधवेत, महिलांच्या डब्यात महिला सुरक्षा रक्षक तैनात करणे व या डब्यांमध्ये सीसी टी.व्ही. बसवावेत, अशा सूचना केल्या. परंतु गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या रेल्वेच्या गोंधळावर मात्र कुणी खासदार पुढे यायला व बोलायला तयार नाही. या आधी तीन महिन्यापूर्वी झालेल्या रेल्वेच्या बैठकीला बहुतेक खासदारांनी दांडी मारली होती.

Story img Loader