मुंबई : बारसूमध्ये तेलशुद्धीकरण प्रकल्पास विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांचे अमानुष अत्याचार सुरू असल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी ही दडपशाही थांबवून पोलीस फौजफाटा मागे घेण्याची मागणी केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मे च्या पहिल्या आठवडय़ात बारसू परिसरातील पाच गावांमध्ये जाऊन रहिवाशांशी संवाद साधणार असून ग्रामपंचायतीने प्रकल्पाविरोधात ठराव केले असल्याचे राऊत यांनी सांगितले.
बारसू परिसरात परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या असून प्रकल्प झाल्यास भूमिपुत्रांचा नव्हे, तर त्यांचा फायदा होणार असल्याचे राऊत यांनी नमूद केले. प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा उद्या (शुक्रवारी) मोर्चाही आयोजित करण्यात आला आहे.प्रकल्पासाठी जमिनीच्या चाचण्या सुरू करण्यात आल्यावर ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्याने गेले चार-पाच दिवस पोलिसांकडून अत्याचार सुरू आहेत. मुंबईत राहणाऱ्या ग्रामस्थांच्या घरी पोलीस पाठवून धमकावण्यात आले. प्रकल्प परिसरात जाण्यास ग्रामस्थ आणि स्थानिक पत्रकारांनाही मज्जाव करण्यात आला. बारसू परिसरात अन्य जिल्ह्यातून सुमारे दोन हजारांचा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यां महिलांना पोलिसांनी फरपटत नेले.
त्यांच्यासाठी मागविण्यात आलेले जेवण आणि पिण्याच्या पाण्याचा टँकरही पोलिसांनी सूचना देऊन मिळू दिला नाही. आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला. महिलांनाही अटक करून रत्नागिरीला नेण्यात आले आणि मानसिक छळ करून रात्री बारा वाजता सोडण्यात आले, असे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आदी महापुरुषांची छायाचित्रे गळय़ात घातली असताना पोलिसांनी ती फाडून टाकून मारहाण केली. गावागावात जाऊन पोलिसांनी जमावबंदी आणि तडीपारीच्या नोटिसा आंदोलनकर्त्यांवर आणि प्रकल्पविरोधातील कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांवर बजावल्या. पोलिसांचे अत्याचार सुरूच असून ते तातडीने थांबविण्यात यावेत. प्रकल्प जनहिताचा असल्यास जनतेशी संवाद साधून त्याची माहिती देण्यात यावी आणि ग्रामस्थांच्या शंका, संशय दूर करावा, असे राऊत यांनी स्पष्ट केले.