मुंबई : मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून माहुल येथील इंधन निर्मिती करणाऱ्या उद्योगांना पर्यावरण नियमांचे उलंघन केल्याप्रकरणी २७ ऑक्टोबर रोजी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन मर्यादित, मे. टाटा पॉवर कंपनी, एजिस लॉजिस्टिक्स व सिलॉर्ड कंटेनर्स या आस्थापनांचा समावेश आहे. याशिवाय, एजिस लॉजिस्टिक्स व सिलॉर्ड कंटेनर्स या उद्योगांची दहा व पाच लाख रुपयांची बँक हमी जप्त करून त्यांना उत्पादन ५० टक्क्यांपर्यंतच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा >>> दिवाळीपूर्वी लोअर परेल पुलाचा उर्वरित भागही सुरू होणार; आदित्य ठाकरे यांनी केली लोअर परेल पुलाची पाहणी
मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी नुकतीच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. त्यामुळे मुंबई वगळता राज्यातील इतर शहरे, ग्रामीण विभाग यामध्ये हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता एमपीसीबीने नियमावली जाहीर केली आहे. सर्व महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनी पर्यावरणविषयक पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या
मार्गदर्शक सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिवांनी स्पष्ट केले आहे.
या नियमावलीत विशेषत: शहरातील बांधकामविषयीची नियमावली मुंबईप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बेकरी उद्योग, स्मशानभूमी येथे लाकूड जाळण्याऐवजी विद्युत वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शहरांनी त्यांच्या स्वत:कडील सामग्रीचा वापर करून हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रे वाढवावीत. जनजागृती करावी, असेही या नियमावलीत म्हटले आहे.
या नियमांचे पालन बंधनकारक!
मुंबई महापालिका क्षेत्रातील ५० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पाच्या परिघाभोवती किमान २५ फूट उंच कथील/ धातूचे पत्रे लावावेत आणि महामंडळाच्या क्षेत्राबाहेर किमान २० फूट उंच कथील/ धातूचे पत्रे लावावेत. मोठे शहर (मेगा सिटीज) – १ एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या सर्व बांधकाम आराखडय़ामध्ये बांधकाम प्रकल्प ठिकाणाभोवती किमान २५ फूट उंचीचे कथील/ धातूचे पत्रे लावलेले असावेत व एक एकरपेक्षा कमी बांधकामाच्या ठिकाणी कथील/ धातूच्या पत्र्याची उंची किमान २५ फूट असणे बंधनकारक आहे.