मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री अशा अनेक किताबांवर नाव कोरणारा मराठमोळा शरीरसौष्ठवपटू आशीष साखरकरचं निधन झालं आहे. काही दिवसांपासून आशीष साखरकर हा एका आजाराशी झुंज देत होता. आज (१९ जुलै) त्याची प्राणज्योत मालवली.
आशीष साखरकर हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असायचा. तो त्याच्या इन्स्टाग्रामवर कायमच शरीरसौष्ठव स्पर्धा, जिम यांमधील व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसायचा. आशीषच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टची सध्या चर्चा रंगताना दिसत आहे.
आणखी वाचा : Ashish Sakharkar Passes Away : मराठमोळा शरीर सौष्ठवपटू आशिष साखरकरचं निधन
आशीषने २५ एप्रिल २०२३ रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने शरीरसौष्ठव स्पर्धेतील एक फोटोही शेअर केला होता. यावेळी त्याच्या गळ्यात मेडलही पाहायला मिळत होते. आशीषने शेअर केलेला हा फोटो ‘मिस्टर युनिव्हर्स २०११’च्या स्पर्धेच्या वेळचा आहे.
“मिस्टर युनिव्हर्स २०११, माझ्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय दिवस, कास्यपदक”, असे त्याने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले होते. आशीषची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्याच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्याचे असंख्य चाहते आणि मित्र श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
दरम्यान, आशीष साखरकरने चार वेळा ‘मिस्टर इंडिया’चा किताब मिळवला होता. त्याबरोबरच तो चार वेळा ‘फेडरेशन कप’ विजेताही ठरला होता. तसेच त्याला ‘मिस्टर युनिव्हर्स’ या स्पर्धेत रौप्य व कास्यपदक मिळाले होते. याबरोबरच त्याने ‘मिस्टर आशिया’ या स्पर्धेत रौप्यपदकाची कामगिरी केली होती. तसेच ‘युरोपियन चॅम्पियनशिप’, ‘शिवछत्रपती’ पुरस्कार अशा अनेक पुरस्कार आणि सन्मानांवर आशीषने स्वत:चे नाव कोरले होते.